Latest

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या जामिनाला ईडीचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान

अविनाश सुतार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : हवाला प्रकरणात अडकलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामिनाला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गेल्याच आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांचा जामीन अर्ज मंजूर केला होता.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीकडून दाखल असलेल्या प्रकरणात जामीन मिळाला होता, मात्र, सीबीआयचे प्रकरणही त्यांच्याविरोधात असल्याने जामीन मिळून देखील ते तुरुंगातून बाहेर येऊ शकले नव्हते. ईडीने नोव्हेंबर २०२१ मध्ये देशमुख यांना अटक केली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. खंडणी वसुलीचा गुन्हा देशमुख यांच्याविरोधात दाखल आहे. मुंबईतील विविध बार आणि हॉटेल चालकांकडून ४.७ कोटी रुपये वसूल केल्याचा ईडीचा देशमुख यांच्याविरोधात आरोप आहे. गैरमार्गाने मिळवलेला पैसा देशमुख यांनी नागपूरस्थित श्री साई शिक्षण संस्थेकडे वळता केल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

गृहमंत्री असतानाच्या काळात देशमुख यांनी मुंबईतील बार आणि हॉटेल मालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश आपणास दिले होते, असा गंभीर आरोप तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. सिंग यांच्या आरोपानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. देशमुख यांनी आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला होता. तथापि मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

हेही वाचलंत का ?

SCROLL FOR NEXT