Latest

चिंता वाढली ! लहरी हवामानामुळे उसाला फुटले तुरे, वजन घटणार !

अमृता चौगुले

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : निसर्गाच्या लहरी हवामानामुळे उसाला तुरे फुटू लागले असून, वजन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसणार आहे. आतापर्यंत इतर पिकांना लहरी हवामानाचा फटका बसत आलेला आहेच, ते संकट आता ऊसउत्पादकांवर आले आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे. 265 या उसाच्या जातीला तुर्‍याचे प्रमाण अधिक आहे, तर 86032 या उसाच्या जातीलासुद्धा यंदा तुरे येऊ लागले आहेत. तुरे आलेल्या उसाचे वाढेदेखील जनावरे खात नाहीत. जास्त प्रमाणात तुरे आल्यामुळे उसाच्या आतमध्ये दशी पडते व ऊस पोकळ होतो आणि परिणामी, उसाचे वजन घटते. यंदाच्या वर्षी सुरुवातीला उसाला काही प्रमाणामध्ये हुमणीचादेखील प्रादुर्भाव झाला होता. काही दिवसांपूर्वी पडलेल्या वादळी पावसामुळे ऊस अनेक ठिकाणी भुईसपाट झाला होता.

पडलेल्या उसाला उंदीरदेखील लागला आहे, अशा सर्व प्रकारच्या संकटांमुळे ऊसउत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस हे एकमेव पीक कमी खर्चाचे व बिगर रोगाचे असे मानले जात होते, परंतु आता गेल्या दोन-तीन वर्षांपासून उसाच्या पिकालादेखील निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे. सध्या लोकरी मावा उसाला नसला तरी तुरे आल्याने ऊसउत्पादक शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. तुरे आलेला ऊस साखर कारखान्यांनी लवकर तोडून न्यावा, अशी धारणा शेतकर्‍यांची असते. परंतु उसाला तुरे सगळीकडे येऊ लागल्याने सगळा ऊस लवकर तोडणे शक्य होणार नाही. जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये उसाची तोडणी साधारण सोळा-सतरा महिन्यांनी होते. आता ज्या उसाला तुरे आले आहेत, तो ऊस साधारण दीड ते दोन महिने तुटू शकत नाही त्यामुळे आपल्या उसाचे वजन घटणार अशी भीती ऊसउत्पादक शेतकर्‍यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये साधारण आठ हजार एकर क्षेत्रामधील ऊसतोडणी करणे बाकी आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT