Latest

Commonwealth Games : नीरज चोप्रा राष्‍ट्रकुल स्‍पर्धेतून बाहेर; भालाफेकीतील पदकाच्‍या आशेला मोठा धक्‍का

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑलिम्पिक गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नुकातचा इतिहास रचला होता. अमेरिकेतील यूजीन येथे झालेल्या चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये नीरजने 88.13 मीटर दूर अंतरावर भालाफेक करत त्‍याने रौप्यपदक पटकावले होते. आता राष्‍ट्रकूल स्‍पर्धेतील ( Commonwealth Games )  कामगिरीकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र या स्‍पर्धेला नीरज चोप्रा मुकणार असून, यामुळे भारताच्‍या पदकाच्‍या आशेला मोठा धक्‍का बसला आहे.

राष्‍ट्रकूल स्‍पर्धेला २८ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. या स्‍पर्धेसाठी नीरज चोप्रा १०० टक्‍के फिट नाही. त्‍याला दुखापत झाली असून स्‍कॅनिंगनंतर त्‍याला एक महिना विश्रांती घेण्‍याचा सल्‍ला डॉक्‍टरांनी दिला आहे. त्‍यामुळे तो राष्‍ट्रकूल स्‍पर्धेला मुकणार आहे, अशी माहिती भारतीय ऑलिंपिक संघाचे महासचिव राजीव मेहता यांनी दिली.

नुकत्‍याच झालेल्‍या अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरजने रौप्‍य पदकावर आपली मोहर उमटवली होती. मात्र याच स्‍पर्धेत नीरजला दुखापत झाली होती. अंतिम स्‍पर्धेत झालेल्‍या दुखापतीमुळे आता तो राष्‍ट्रकूल स्‍पर्धेला मुकणार आहे.

राष्‍ट्रकूल स्‍पर्धेत भारताचा तिरंगा फडकविण्‍याचा मान नीरज चोप्राला मिळाला होता. मात्र तो दुखापतग्रस्‍त असल्‍याने आता भारताचा झेंडा कोण घेणार? यावर लवकर निर्णय होईल, अशी माहिती भारतीय ऑलिंपिक संघाचे महासचिव राजीव मेहता यांनी दिली.

Commonwealth Games : आता 'या' खेळाडूंवर असेल जबाबदारी

नीरज चोप्रा हा राष्‍ट्रकूल स्‍पर्धेत ५ ऑगस्‍टला मैदानात उतरणार होता. आता त्‍याच्‍या अनुपस्‍थितीत भालाफेकपटू डीपी मनू आणि रोहित यादव यांच्‍यावर पदक पटकविण्‍याची जबाबदारी असेल. या स्‍पर्धेत नीरजचे सुवर्णपदक
निश्‍चित मानले जात होते. मात्र तो जखमी असल्‍याने आता सर्वांच्‍या नजरा डीपी मनू आणि रोहित यादव यांच्‍या कामगिरीवर असेल.

२०१८ राष्‍ट्रकूल स्‍पर्धेत नीरजने साधला होता सुवर्णवेध

२०१८ मध्‍ये झालेल्‍या राष्‍ट्रकूल स्‍पर्धेत नीरजने ८६.४७ मीटर भालाफेकत सुवर्ण पदक पटकावले होते. यानंतर २०१९ मध्‍ये नीरज दुखापत झाली होती. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्‍याच्‍या करिअरवरच प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले होते. नीरजचे ऑपरेशन झाले. एक वर्ष त्‍याला विश्रांती घ्‍यावी लागली होती. पूर्ण बरे झाल्‍यानंतर त्‍याने पुन्‍हा एकदा कसून सराव केला. यानंतर टोकियो ऑलंम्‍पिकमध्‍ये उत्‍कृष्‍ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले होते.

SCROLL FOR NEXT