Latest

Dudhganga Vedganga Karkhana election | ‘बिद्री’च्या निवडणुकीत ए. वाय. पाटील यांची भूमिका महत्त्वाची! के. पी. यांच्यासोबत समझोता होणार का?

दीपक दि. भांदिगरे

मुदाळतिट्टा, प्रा. शाम पाटील : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ए‌. वाय. पाटील बिद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत (Dudhganga Vedganga Sahakari Sakhar Karkhana election) कोणती भूमिका घेणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. बिद्रीचे विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील यांचे ते मेहुणे आहेत. पण आमदारकी आपल्याला मिळाली पाहिजे यासाठी ते नाराज आहेत. यातून बिद्रीच्या निवडणुकीत ते काय करणार? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्यामध्ये बिद्री संदर्भात समझोता एक्स्पेस धावणार काय? याचीही चर्चा सुरू आहे.

के. पी यांचा पराभव, दुराव्याचे कारण

ए. वाय. पाटील यांनी आजपर्यंत बिद्री साखर कारखान्यात संचालक म्हणून काम केले आहे. याचबरोबर ते गेल्या अनेक वर्ष जिल्हा बँकेत संचालक आहेत. राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर त्यांची चांगली पकड आहे. त्यांना मानणारा मोठा कार्यकर्त्यांचा वर्ग राधानगरी तालुक्यात आहे. त्यामुळे के. पी. यांनी आमदारकीमध्ये कोणत्याही पद्धतीचा धोका होऊ नये यासाठी ए. वाय. पाटील यांच्याकडे जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष पदाची धुरा सोपवली. त्याचे काम हे त्यांनी चांगले केले. पण गेल्या दोन वेळा के. पी यांनी आमदारकीला पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचे खापर कार्यकर्त्यांनी ए. वाय. पाटील यांच्यावर फोडले. असे जरी असले तरी आमदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर लक्ष घालून हा विषय सोडवण्याचे काम केले त्यामुळे के. पी. यांच्यामध्ये समझोता झाला.

ए .वाय. पाटील यांची आमदारकीसाठी उमेदवारीची मागणी

असे जरी असले तरी ए. वाय. पाटील यांनी के. पी. पाटील यांच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. थोड्याफार मताच्या फरकाने के पी. ना पराभव स्वीकारावा लागला. ए. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आमदारकीसाठी उमेदवारीची मागणी केली होती. पण के. पी. पाटील यांचे पारडे जड असल्याने त्यांनाच दोन वेळा उमेदवारी मिळाली. सध्या उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी ए .वाय. पाटील प्रयत्न करीत आहेत.

प्रकाश आबिटकर आणि ए. वाय. पाटील यांची भेट

दरम्यान, राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आले. यावेळी ए. वाय. पाटील यांच्या भूमिकेत बदल पहावयास मिळाला. कामाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी एक दोन वेळा भेट घेतली. ए. वाय. शिंदे गटात जाणार अशी चर्चाही सुरू झाली. दरम्यानच्या काळात आमदार प्रकाश आबिटकर आणि ए. वाय. पाटील यांचा एक संयुक्त कार्यक्रम झाला. त्यामुळे वरील बाबीला पुष्टी मिळाली. पण आमदार मुश्रीफ यांनी वेळीच लक्ष घालून दोघांना सूचना व आवाहन करण्याचे काम केले.

निवडणूक बिनविरोध होत असेल तर…

बिद्रीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे खासदार संजय मंडलिक यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आवाहन केले याला उत्तर देत असताना कुरुकली (ता. कागल) येथील विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार हसन मुश्रीफ यांनी बिद्रीची निवडणूक बिनविरोध करावयास येणाऱ्यांचे सर्वांचे स्वागत करू. पण हे कसं शक्य आहे की बिद्रीची निवडणूक बिनविरोध होईल. चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र, साठ हजाराच्या जवळपास सभासद, आपल्या कार्यकर्त्याला संधी द्यावी हे प्रत्येक नेत्याला वाटते. तरीपण जर निवडणूक बिनविरोध होत असेल तर आपण स्वागत करू असे सांगितले.

ए. वाय आणि के. पी यांची एकी होणार?

याचा धागा पकडत आमदार मुश्रीफ यांनी ए. वाय, के. पी हे मेव्हणे-पाव्हणे एकच असल्याचा निर्वाळा दिला. के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील या मेव्हण्या-पाव्हण्यांशी माझी चाळीस वर्षापासूनची मैत्री आहे. त्यांनी कधीही आपल्या भावनांचा अनादर केला नाही. ए. वाय. पाटील कार्यक्रमास आले पण मंचावर थांबले नाहीत. याकडे लक्ष वेधत आमदार मुश्रीफ म्हणाले, 'या दोघांनाही कसे एकत्र बांधायचे हे मला चांगलेच माहिती आहे. त्यांच्यात कुठलेही मतभेद नाहीत. आतून ते दोघे एकत्रच आहेत. आपण स्वतः के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्याबाबत निर्णय घेऊ, असे सांगून होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम दिला. पण बिद्रीच्या निवडणुकी संदर्भात अजून बऱ्याच राजकीय हालचाली होणार आहे. (Dudhganga Vedganga Sahakari Sakhar Karkhana election)

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT