पुढारी ऑनलाईन डेस्क : सहकारी खेळाडू आणि कर्मचाऱ्यांसोबत नेहमी विनोद करण्यासाठी ओळखला जाणारा लेगस्पिनर युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) त्याच्या आयुष्याशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे. चहलने सांगितले की, 9 वर्षांपूर्वी आयपीएल सामन्यानंतर एका खेळाडूने त्याला मद्यधुंद अवस्थेत 15 व्या मजल्यावरच्या बाल्कनीत लटकवले. त्यावेळी काही एक चूक झाली असती तर तो खालीच पडला असता, जिवावर बेतले असते. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनशी बोलताना त्याने हा खुलासा केला आहे.
31 वर्षीय चहल (Yuzvendra Chahal) आयपीएल 2022 च्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून (RR) खेळत आहे. चहलचा एक व्हिडिओ राजस्थान फ्रँचायझीने स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओअमध्ये चहलसोबत आर. अश्विन आणि करुण नायरही दिसत आहे.
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) म्हणाला, माझ्याबाबतीत एक घडलेली घटना फार कमी लोकांना माहीत आहे. मी आजपर्यंत त्याबाबत कुणालाही सांगितलेले नाही. 2013 मध्ये मी मुंबई इंडियन्सकडून खेळत होतो. आमचा एक सामना बंगळुरू झाला. सामना संपल्यानंतर गेट टूगेदर झाले. एक खेळाडू होता जो खूप नशेत होता. मी त्याचे नाव घेणार नाही. तो कितीतरी वेळ माझ्याकडे बघत होता. त्याने मला बोलावले आणि अचानक उचलून बाल्कनीत लटकवले. या गडबडीत मी माझ्या हाताने त्या खेळाडूचे डोके धरले. पण त्यावेळी माझा हात निसटला असता तर मी पंधराव्या मजल्यावरून खाली कोसळलो असतो.'
चहल (Yuzvendra Chahal) पुढे म्हणाला, मला लटकवलेले पाहताच तिथे उपस्थित असणारे इतर लोक आले आणि त्यांनी सर्व गोष्टींची काळजी घेतली. मी भीतीने थरथर कापत होतो. माझी अवस्था बेशुद्ध झाल्यासारखी होती. उपस्थितांनी मला पाणी प्यायला दिले. ती एक धक्कादायक घटना होती. त्या घटनेतून मी मरता मरता वाचलो. थोडीशीही चूक झाली असती तर मी खाली पडलो असतो.
गेल्या आयपीएल हंगामापर्यंत चहल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) कडून खेळताना दिसला होता. आरसीबीने चहलला रिटेन केले नाही. त्यानंतर आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने 6.50 कोटी रुपयांची बोली लावून त्याला विकत घेतले. चहलने आतापर्यंत आयपीएलमध्ये बेंगळुरू आणि राजस्थान व्यतिरिक्त मुंबई इंडियन्सकडून प्रतिनिधित्व केले आहे. मुंबई हा आयपीएलमधला चहलचा पहिला संघ होता.