Latest

Drug Smugglers : पश्चिम महाराष्ट्र, सीमाभागात ड्रग्ज तस्कर सक्रिय; सीमाभागात कोट्यवधींच्या उलाढाली

backup backup

कोल्हापूर : दिलीप भिसे

कोकेन, चरस, अफू, गांजा, एमडीसह अन्य प्रचलित ड्रग्जच्या (अमली पदार्थ) तस्करी आणि सेवनावर कडक निर्बंध असतानाही पश्चिम महाराष्ट्रासह सीमाभागात देश-विदेशातील आंतरराष्ट्रीय टोळ्यांच्या उलाढाली वाढल्या आहेत. नेपाळमधील विक्रम नरबहादूर मगर ऊर्फ थापा (भुटवल) पाठोपाठ टांझानियातील ड्रग्ज तस्कराला बेड्या ठोकून 11 लाखांचे कोकेन हस्तगत करण्यात आले.

तत्पूर्वी, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीला जेरबंद करून कोट्यवधीचा साठा हस्तगत केला. लॉकडाऊन काळात तरुणाईच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांनी तस्करीचा बाजारच मांडला आहे. (Drug Smugglers)

आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल, कमकुवत घटकांसह उच्चशिक्षित तरुणांच्या आयुष्याची दीड वर्षात, लॉकडाऊन काळात अक्षरश: फरफट झाली आहे. परिस्थितीचा गैरफायदा घेत तस्करांनी शहर, ग्रामीण भागातील अगणित बेरोजगारांचा तस्करीसाठी वापर केला आहे. विशेषत:, सीमाभागातील तस्करीचा वाढता टक्का सामाजिकद़ृष्ट्या चिंतेचा विषय ठरला आहे.

17 ते 25 वयोगटातील तरुणांमध्ये अमली पदार्थ सेवनाचे वाढते प्रमाण धक्कादायक आहे. त्यामुळेच ड्रग्ज माफियांनी पश्चिम महाराष्ट्रात, विशेषकरून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत खुलेआम बाजार चालविला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात या टोळ्यांची चांगलीच चलती सुरू आहे. (Drug Smugglers)

कनेक्शनची पाळेमुळे शोधण्याची गरज

नेपाळमधील आंतरराष्ट्रीय तस्कराला इचलकरंजीत नुकत्याच बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्याकडून चरस हस्तगत करण्यात आले. वास्तविक, जेरबंद तस्कराची पोलखोल होण्याची गरज होती. गोव्यातून मोठी उलाढाल करून इचलकरंजीत शिरकाव केलेल्या तस्कराच्या कनेक्शनची पाळेमुळे शोधण्याची गरज होती. तस्कराने यापूर्वीही इचलकरंजीसह कोल्हापूरची वारी केली होती; पण स्थानिक यंत्रणांना थांगपत्ता लागला नाही. या कनेक्शनचा वेळीच उलगडा झाला असता, तर अनेक सराईत टोळ्यांचा पर्दाफाश झाला असता.

महाराष्ट्रातील ड्रग्ज तस्करी चिंताजनक!

अमली पदार्थ तस्करी आणि सेवनावर कडक निर्बंध लागू असतानाही महाराष्ट्रात बेधडक तस्करीचा बाजार मांडलेला आहे. दहा वर्षांत देशात 3 लाखांवर गुन्हे दाखल झाले आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने 2009 ते 2010 या काळात अनुक्रमे 19.51 व 17.05 कोटींचे ड्रग्जचे साठे हस्तगत केले आहेत. ऑक्टोबर 2021 पर्यंत यात 35 ते 40 पटीने वाढ झाल्याचे दिसून आले. पंजाब, हरियाणा, मणिपूरसह महाराष्ट्रातही तस्करीचा वाढलेला टक्का धोकादायक ठरणारा आहे. (Drug Smugglers)

कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांत कनेक्शन!

पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकात दोन वर्षांत अमली पदार्थ तस्करीची पाळेमुळे खोलवर रुजविण्यात आली आहेत. स्थानिक टोळ्यांना हाताशी धरून तस्करीचा पसारा वाढविण्यात येत आहे. शहरात अनेक निर्जन ठिकाणे सकाळ-सायंकाळी गर्दीने फुललेली असतात. तस्करांनी स्थानिक यंत्रणांना आव्हान दिले असतानाही प्रभावी कारवाईची मात्रा चालविली जात नाही, याचेच आश्चर्य आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत नुकत्याच जेरबंद झालेल्या आंतरराष्ट्रीय तस्करांचा पर्दाफाश झाल्यास बुरख्याआड दडलेल्या पिलावळीचे मुखवटे नक्कीच चव्हाट्यावर येऊ शकतील; पण तपास यंत्रणांनी त्याद़ृष्टीने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT