Latest

Syria News : सीरियातील लष्करी अकादमीवर ड्रोन हल्ला: १०० ठार, २४० जखमी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सीरियातील होम्स शहरातील लष्करी अकादमीवर आज (दि.६) ड्रोन हल्ला करण्यात आला. यामध्ये १०० जणांचा मृत्यू, तर २४० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, आरोग्य मंत्री हसन अल-घाबाश यांनी सांगितले की, मृतांमध्ये सहा मुलांसह नागरिक आणि लष्करी जवानांचा समावेश आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Syria News)

सीरियाच्या मध्यवर्ती शहर होम्समध्ये लष्कराच्या 'पासिंग आऊट परेड' कार्यक्रमादरम्यान हा ड्रोन हल्ला करण्यात आला. अलिकडच्या वर्षांत सीरियन सैन्यावरील हा सर्वात प्राणघातक हल्ला होता. सीरियामध्ये गेल्या तेरा वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. (Syria News)

जखमींमध्ये नागरिक आणि लष्करी जवानांचा समावेश

होम्स शहराचे आरोग्य संचालक डॉ. मुसलेम अल-अतासी यांनी सांगितले की, हल्ल्यांचा परिणाम होम्समध्ये होत असलेल्या समारंभावर झाला आहे. जखमींमध्ये नागरिक आणि लष्करी जवानांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. अल-अतासी यांनी सांगितले की, जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सीरियातील मोठे शहर होम्समधील अनेक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

Syria News : सीरियामध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे

सीरियन सैन्याने निवेदनात म्हटले आहे की, स्फोटकांनी सुसज्ज ड्रोनने तरुण अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य केले. कोणत्याही विशिष्ट गटाचे नाव न घेता, बंडखोरांना या हल्ल्यासाठी जबाबदार धरले आहे. मात्र, अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. सीरियाच्या सरकारी टेलिव्हिजनने सांगितले की, सरकारने शुक्रवारपासून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT