Latest

निखळ जगणं ही तपश्चर्या : महेश एलकुंचवार, डॉ. अभय बंग यांच्‍या ‘या जीवनाचे काय करू ?’ पुस्‍तकाचे प्रकाशन

नंदू लटके

नागपूर: पुढारी वृत्तसेवा – 'या जीवनाचे काय करू ?' या प्रश्नाचे उत्तर हे 'जगू' असे असावे परंतु, जीवन जगताना ते मनापासून, सर्वार्थाने, प्रामाणिकपणे जगावे. जीवन हे निखळ पद्धतीने जगणे ही एकप्रकारे तपश्चर्या आहे, असे मत ज्‍येष्‍ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केले. समाजसेवक, 'शोधग्राम'चे संस्‍थापक व लेखक पद्मश्री डॉ. अभय बंग लिखित 'या जीवनाचे काय करू ?… आणि निवडक' या पुस्‍तकाचा प्रकाशन सोहळाप्रसंगी ते बोलत होते.

येथील कवी कुलगुरू कालिदास सभागृह, परसिस्‍टंट सिस्टिम्‍स, गायत्रीनगर येथे पुस्‍तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. राजहंस प्रकाशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात ज्‍येष्‍ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्‍या हस्‍ते या पुस्‍तकाचे प्रकाशन झाले. डॉ. अभय बंग यांच्‍यासह सुरेश पांढरीपांडे, आणि राजहंस प्रकाशनचे नरेश सबजीवाले यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

या वेळी महेश एलकुंचवार म्‍हणाले, अभय बंग यांचे पुस्तक जीवन मूल्यांची जाण करून देणारे आणि पथदर्शक असे आहे. त्यात विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांची भेट होते आणि सुसंगतता समजून येते. त्यांनी बंग यांच्या सरळ,सोप्या शैलीमधील दर्जेदार लिखाणाचे कौतुक केले. यावेळी एलकुंचवार यांनी वर्तमान परिस्थितीत धूसर होत असलेल्या आशावादावर देखील आपल्या शैलीत भाष्य केले.

ज्ञान, कर्म आणि भक्ती याचे सुंदर प्रतिबिंब या पुस्तकातून दिसून येते. बदल घडवायचा असेल तर त्याची सुरवात ही स्वतःपासून व्हावी, असे या पुस्तकाच्या प्रत्येक पानात आहे, असे मत सुरेश पांढरीपांडे यांनी व्‍यक्‍त केले. तसेच याला दुजोरा देण्यासाठी त्यांनी गांधीजींच्या जीवनातील एक गोष्ट देखील सांगितली. या पुस्तकात विनोबा भावे यांच्यावर दोन लेख असून त्यांच्या जीवनावरील लेखात गांधींचा 'सत्याग्रह' आणि स्वातंत्र्य पश्च्यात विनोबा यांची 'सत्यग्राही' या त्यांच्या कार्यपद्धती बाबत काहींच्या शंकांचे निरसन होते, असेही ते म्‍हणाले.

सुरवातीला राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांचा शुभेच्छा संदेश जया सबजीवाले यांनी वाचून दाखविला. राजहंस प्रकाशन तर्फे यावेळी डॉ. अभय बंग यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, आशुतोष शेवाळकर, सरपोतदार यांची उपस्थिती होती.

हा युवकांशी साधलेला संवाद – डॉ. अभय बंग

वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाल्याने आयुष्यमान वाढले आहे. परंतु या वाढलेल्या आयुष्याला जर हेतू नसेल तर काय होईल. कदाचित ते 'हेल' होईल, असे डॉ अभय बंग म्हणाले . त्यामुळे किती जगायचं हा विचार नसावा तर कसं जगावं हा प्रश्न आहे. सध्या प्रश्न आयोजनाचा नसून 'प्रयोजनाचा' आहे असे ते म्हणाले. स्वभाव, स्वधर्म आणि युगधर्म या विनोबांच्या त्रिसूत्रीचा आधार घेता येऊ शकेल, असेही डॉ. बंग यांनी या वेळी सांगितले.

डॉ. अभय बंग यांनी विविध विषयांवर लिहिलेल्‍या लेखांचा व दिलेल्‍या भाषणांचा संग्रह असलेल्‍या 'या जीवनाचे काय करू ?… आणि निवडक' या पुस्‍तकाच्‍या माध्‍यमातून आपल्‍या मनातील प्रश्‍नाची उत्‍तरे शोधण्‍याची संधी या निमित्‍ताने युवापिढील मिळणार आहे, असे मत राजहंस प्रकाशन चे नरेश सबजीवाले यांनी आभार प्रदर्शन करताना व्यक्त केले. वृषाली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला अमृत व आरती बंग, दमयंती पंढरीपांडे, परसिस्टंट सिस्टिम चे समीर बेंद्रे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT