Latest

Pune Ganeshotsav 2023 : बाप्पांच्या विसर्जन करताना गडबड नको..! गेल्या वर्षी राज्यभरात 28 जणांचा मृत्यू

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे) : सलग दहा दिवस चालणार्‍या गणेशोत्सवाची राज्यभरात मोठ्या धूमधडक्यात सुरुवात झाली आहे. मंगळवारी (दि. 19) ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे आगमन झाले. त्यानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी दीड दिवसाच्या घरगुती गणपतींचे विसर्जन पार पडले; मात्र विसर्जना वेळी तरुणांसह लहान मुलांना भान राहत नसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी राज्यभरात 20 घटनांमध्ये तब्बल 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. यामध्ये गणेशमूर्ती विसर्जित करताना बुडून मृत्यू पावलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यंदा गणेशभक्तांनी खबरदारी घेऊनच बाप्पांचे विसर्जन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

राज्यभरात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. छोट्या मोठ्या मंडळांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन पार पडले असून, आता लागोपाठ पाच, सात, नऊ आणि दहाव्या दिवसांचा बाप्पा विसर्जित होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नऊ आणि दहव्या दिवशीच्या विसर्जन मिरवणूक भव्य स्वरूपात असतात. या दिवशी विसर्जन घाटावर गणेशभक्तांची गर्दी होते.

गणेशोत्सवाच्या धावपळीत वाहने चालवतानादेखील काळजी घेण्याची गरज आहे. मागील वर्षी नागपुरातील शक्करदरा परिसरात झालेल्या रस्ते अपघातामध्ये चौघांना जीव गमवावा लागला आहे. ठाण्यातील कोलबाड परिसरात पावसामुळे गणेश मंडपावरच झाड कोसळले. यामध्ये 55 वर्ष व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तसेच, रायगड येथील पनवेल येथे विजेच्या धक्क्याने नऊ वर्षाच्या मुलीसह इतर 11 जण जखमी झाल्याची नोंद आहे.

  • बाप्पांना निरोप देत असताना गणेशभक्तांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचे समोर येऊ लागले आहे. उत्साहाच्या भरात प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांकडे तरुणांकडून दुर्लक्ष केले जाते. परिणामी लाडक्या बाप्पाच्या उत्साहाला गालबोट लागत आहे.
  • मागील वर्षी राज्यभरात गणेशोत्सवाच्या कालावधीत एकूण 20 ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या आहेत. यामध्ये एकूण 28 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गणेश मंडपावर झाड पडल्याने, रस्ते अपघात आणि विसर्जना वेळी बुडून मृत्यू पावलेल्यांची नोंद आहे. यातील सर्वाधिक मृत्यू गणेशमूर्ती विसर्जित करताना झाले आहेत.
  • या पार्श्वभूमीवर महासंचालक कार्यालयाने राज्यातील सर्व घटक प्रमुखांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, पिंपरी- चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विसर्जन घाटाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे.

महापालिकेच्या व्यवस्थेचा घेतला आढावा

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शहरातील विसर्जन घाट, मिरवणूक मार्गांना भेट देत पाहणी केली. या वेळी महापालिकेने नेमणूक केलेले जीवरक्षक, रात्रीच्या वेळी लाईट्सची केलेली व्यवस्था, गणेशभक्तांना सूचना करण्यासाठीचे ध्वनिक्षेपक यंत्र, दोरखंड, लाईफ बोट, जॅकेट्स आदी बाबींचा आढावा चौबे यांनी घेतला.

ग्रामीण भागात अधिक दुर्घटना

मागील वर्षीदेखील प्रशासनाने ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. तरीदेखील नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे काही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातच अधिकच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सांगवी येथे तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर, याच जिल्ह्यातील देवळीत बाप्पांचे विसर्जन करीत असलेल्या एकाला जलसमाधी मिळाली. यवतमाळ, नगर आणि जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT