Latest

Long Covid : ‘लाँग कोविड’ असे काहीच नाही; थकवा, अशक्तपणा ‘या’ सामान्य तक्रारी, संशोधकांचा मोठा दावा

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनानंतर (COVID-19) जगभरात गंभीर आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. कोविड-१९ बाबतच्या अनेक अभ्यासांमध्ये संसर्गामुळे होणारा आजार तसेच कोविड नंतरच्या अथवा 'लाँग कोविड' जोखमींबद्दल सतर्क केले गेले आहे. मात्र, आता संशोधकांनी 'लाँग कोविड'ची (Long Covid) संकल्पना पूर्णपणे नाकारली आहे. थकवा आणि अशक्तपणा यासारख्या समस्या सामान्य आहेत. याला 'लाँग कोविड' म्हणू नका. ही संज्ञा वापरणे थांबवण्याची वेळ आली आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे.

'लाँग कोविड' (Long Covid) म्हणजे कोरोना (COVID-19) संसर्गातून बरे झालेल्या लोकांमध्ये दीर्घकालीन आरोग्य समस्या राहणे. लाँग कोविडमुळे फुफ्फुस आणि हृदयाशी संबंधित समस्यांसह मेंदूच्या समस्या आणि कमी आयक्यू (IQ) पातळी यासारख्या समस्या उद्भवू शकतात, असे याआधी काही अभ्यासात म्हटले आहे. मात्र ऑस्ट्रेलियास्थित क्वीन्सलँड हेल्थच्या (Queensland Health) नवीन अभ्यासात 'लाँग कोविड' या संकल्पनेला आव्हान दिले आहे. कोविड-१९ मधून बरे झालेल्या लोकांमध्ये लाँग कोविड' म्हणता येईल असा कोणताही बदल दिसला नाही, असे या अभ्यासात म्हटले आहे.

Long Covid : रुग्णांच्या लक्षणांमध्ये जास्त फरक नाही

फ्लू सारखा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये आणि कोविड-१९ (COVID-19) ची लागण झालेल्या लोकांमध्ये जास्त फरक दिसला नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. या अभ्यासात ५,११२ प्रौढ व्यक्तींना पाहण्यात आले, ज्यांना श्वसनाच्या आजाराची लक्षणे होती. मे २०२२ ते जून २०२२ दरम्यान त्यांच्या चाचण्या झाल्या. यातील सुमारे अर्ध्या लोकांना कोरोना होता, तर काहींना फ्लू होता. एक वर्षानंतर, संशोधकांनी सहभागींना लक्षणांबद्दल आणि त्यांच्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम झाला याबद्दल विचारले. त्यांना आढळले की सुमारे १६ टक्के लोकांना अजूनही लक्षणे आहेत. परंतु केवळ ३.६ टक्के लोकांना मध्यम ते गंभीर समस्या होत्या. ज्यांना कोरोना संसर्ग आहे त्यांना फ्लू झालेल्या लोकांच्या तुलनेत दीर्घकालीन समस्या होण्याची शक्यता जास्त नाही.

Long Covid : तज्ज्ञ काय म्हणतात?

युरोपियन काँग्रेस ऑफ क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शियस डिसीजेस (ECCMID) नुसार, अभ्यासातून असे दिसून आले आहे की, लाँग कोविड म्हणून दिसणारी लक्षणे ही हंगामी फ्लू आणि इतर श्वसन रोगांसारखीच आहेत. ज्यामध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण फरक दिसून आलेले नाहीत. क्वीन्सलँडचे मुख्य आरोग्य अधिकारी जॉन गेरार्ड (Dr John Gerrard) यांनी म्हटले आहे की, कोविड-19 मुळे रुग्णांच्या बरे होण्यावर होणारे परिणाम अधिक लक्षणीय झाले आहेत. परंतु ज्या लोकांना लसीकरण करण्यात आले आहे, त्यांना कोरोनाचे दीर्घकालीन धोके दिसत नाहीत.

Long Covid : 'लाँग कोविड' म्हणू नका

संशोधकांचे म्हणणे आहे की, निष्कर्षांमधून समोर आलेल्या गोष्टींच्या आधारे आता 'लाँग कोविड' (Long Covid) म्हणणे बंद करण्याची वेळ आली आहे. ही संज्ञा अनावश्यक भीती निर्माण करते आणि काही प्रकरणांमध्ये अतिदक्षता आणि लाँग कोविडची भीतीदेखील लोकांना आजारी बनवत आहे. संसर्गातून बरे झाल्यानंतर आरोग्याची काळजी घेऊन निरोगी आरोग्य राखता येते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT