Latest

Divya Pahuja murder case | मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह कालव्यात सापडला

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : हरियाणातील गुरुग्राम येथील एका हॉटेलात २ जानेवारी रोजीच्या रात्री २७ वर्षीय मॉडेल दिव्या पाहुजा (Divya Pahuja) हिची हत्या झाली होती. गुरुग्राम पोलिसांच्या पथकाने आज शनिवारी दिव्या पाहुजा हिचा मृतदेह ताब्यात घेतला. हरियाणातील तोहना येथील कालव्यात पाहुजाचा मृतदेह सापडला. गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाहुजाच्या मृतदेहाचा फोटो तिच्या कुटुंबीयांना पाठवण्यात आला होता. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. (Divya Pahuja murder case)

पाहुजाच्या मृतदेहाचा शोध गुरुग्राम पोलिसांची सहा पथके घेत होती. दरम्यान, पंजाब पोलिसांच्या अनेक पथके आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) २५ सदस्यांच्या पथकाच्या मदतीने मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला. याआधी गुरुवारी या प्रकरणातील प्रमुख संशयित बलराज गिल याला पोलिसांनी पश्चिम बंगाल सीमेजवळ अटक केली होती.

हरियाणातील तोहना येथील एका कालव्यात पाहुजाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची माहिती संशयिताने पोलिसांना दिली होती.

पोलिसांनी या हत्या प्रकरणी सिटी पॉइंट हॉटेलचा मालक अभिजित सिंह याच्यासह हॉटेलमध्ये काम करणाऱ्या हेमराज आणि ओमप्रकाश यांना अटक केली होती. या हत्या प्रकरणाच्या चौकशीत अनेक मोठे खुलासे समारे आले आहेत. यामुळे हे हत्या प्रकरण चर्चेत आहे.

गँगस्टर संदीप गाडोली (gangster Sandeep Gadoli) याच्या कथित 'फेक' एन्काउंटर प्रकरणी दिव्या पाहुजाला सात वर्षांची शिक्षा झाली होती. गाडोलीची गर्लफ्रेंड असलेल्या पाहुजाला गेल्या वर्षी जूनमध्ये जामीन मंजूर झाला होता. काही महिन्यांनंतर गेल्या मंगळवारी गुरुग्रामच्या एका हॉटेलमध्ये तिची हत्या करण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेज आले समोर

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली होती. ज्यात अभिजीत, एक तरुणी आणि आणखी एक व्यक्ती २ जानेवारीच्या पहाटे ४ वाजता हॉटेलच्या रिसेप्शनवर पोहोचून रूम नंबर १११ कडे जाताना दिसले होते. संशयित अभिजीतने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, दिव्याच्या मोबाईलमध्ये त्याचे काही अश्लिल फोटो होते आणि त्या बदल्यात ती त्याला ब्लॅकमेल करत होती. ती त्याच्याकडून पैसेही घेत होती. अभिजीत पासवर्ड मागत होता आणि दिव्याने तो त्याला दिला नाही तेव्हा त्याने तिची गोळ्या झाडून हत्या केली.

दिव्या पाहुजा कोण आहे?

मॉडेल दिव्या पाहुजा ही गुरुग्राम येथील बलदेव नगर येथील रहिवासी आहे. ती कधी काळी गँगस्टर संदीप गाडोली याची गर्लफ्रेंड होती. हरियाणा पोलिस संदीपचा शोध घेत होती. याचदरम्यान ७ फेब्रुवारी २०१६ रोजी हरियाणा पोलिसांना माहिती मिळाली की संदीप अंधेरी, मुंबईतील एका हॉटेलमध्ये आहे. त्यानंतर पोलिस तेथे पोहोचली आणि तेथे संदीपचा एन्काउंटर करण्यात आला. ज्यावेळी संदीपचा एन्काउंटर झाला त्यावेळी दिव्या मुंबईतील त्याच हॉटेलमध्ये होती. ती संदीप गाडोली एन्काउंटर प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती. हरियाणा पोलिसांनी केलेल्या संदीप एन्काउंटर प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात दिव्याला साक्षीदार बनवले. यासोबतच दिव्यावर तिचा बॉयफ्रेंड म्हणजेच संदीप गाडोली विरुद्ध हरियाणा पोलिसांना माहिती दिल्याचा आरोप होता. या संपूर्ण प्रकरणात दिव्याच्या कुटुंबीयांनी गँगस्टर संदीप गाडोलीची बहीण सुदेश कटारिया आणि भाऊ ब्रह्मप्रकाश यांचा हात असल्याचा आरोप केला होता. दिव्याच्या कुटुंबीयांनी सुदेश आणि ब्रह्मप्रकाश यांच्या विरोधात हत्येचा कट रचल्याची तक्रारदेखील दाखल केली होती.

दिव्या पाहुजाच्या बहिणीने तक्रारीत म्हटले आहे की, २ जानेवारीच्या सकाळी आपण दिव्याशी बोललो. पण रात्री तिचा नंबर नॉट रिचेबल येऊ लागला. संशय आल्यावर मी हॉटेल मालक अभिजीतला फोन केला. पण तो काहीही सांगायला तयार नव्हता. यानंतर तिचा खून झाल्याची बातमी समोर आली होती.


हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT