Latest

विखेंचे पुन्हा तुझ्या गळा.. माझ्या गळा..आगामी काळातील राजकारणाचे संकेत

अमृता चौगुले

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  राज्याचे महसुल आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कोपरगाव मतदार संघात पुन्हा लक्ष केंद्रित करून 'तुझ्या गळा.. माझ्या गळा. फुलवू विधानसभेचा मळा' अशी हाक देत त्यानुरूप आतापासूनच रणशिंंग फुंकले आहे. सध्याचे लोकप्रतिनिधी यांचा माहेगांव देशमुख व महानंदाचे अध्यक्षांचे संवत्सर गावचा मंगळवारचा दौरा लक्षकेंद्रीत झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी धोरणामुळे कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण देशभरात मोफत लसीकरण आणि मोफत धान्य वितरण या दोन योजना सर्वसामान्य जनतेच्या जीवनात आधारभूत ठरल्या असून यापुढे ग्रामीण भागातील जनतेला गुणवत्तापूर्ण व दर्जेदार आरोग्याच्या सेवा मिळण्यासाठी आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यावर शासन अधिक भर देणार असल्याचे सूतोवाच राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

संबंधित बातम्या :

तालुक्यातील संवत्सर येथे सुमारे 21 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणार्‍या 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे भूमीपूजन तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संवत्सर, कान्हेगांव, वारी या रस्त्याच्या दर्जोन्नतीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार आशुतोष काळे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, भाजपाचे नेते रवींद्र बोरावके, कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. गोरक्षनाथ बर्डे, महानंदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

राज्यातील बारा कोटी लोकांना महात्मा फुले आरोग्य योजनेतून मोफत आरोग्य सुविधा देण्याचा कल्याणकारी निर्णय सरकारने घेतला आहे. संवत्सरसारख्या ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालयाची सुविधा निर्माण होत असल्याने तालुक्यातील जनतेला याचा चांगला लाभ मिळणार आहे. पालकमंत्री विखे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगात भारताची नवीन प्रतिमा तयार होत आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास' हा मंत्र बलशाली भारताच्या विकासाचे सूत्र बनले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देऊन सामांन्यांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही विखे पाटील म्हणाले. यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून भावना व्यवक्त केल्या. याप्रसंगी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझ्या उमेदवारीमुळे विखे पाटलांना सासुरवास
माझ्या भूमिकेमुळे अनेकांना संभ्रम झाला, मात्र त्याचा सासुरवास मंत्री राधाकृष्ण विखे यांना सहन करावा लागला, असे स्पष्ट करत आगामी काळात विकासाच्या मुद्द्यावर काळे, परजणे, वहाडणे, कोयटे सर्वजण एकत्रित काम करण्याची ग्वाही राजेश परजणे यांनी दिली.

SCROLL FOR NEXT