Latest

राज्यसभा विरोधी पक्षनेते पदासाठी ‘या’ नावांची चर्चा

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांनी आज (दि.१) राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. आता खर्गे यांच्या जागी नवा विरोधी पक्षनेत्याची निवड करावी लागणार आहे. या पदासाठी ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह आणि के. सी. वेणुगोपाल यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे स्वीकारली होती. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक खर्गे लढवत आहेत. अशात पक्षाने नुकत्याच पारित केलेल्या 'एक नेता एक पद' प्रस्तावानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जेडीजीप धनखर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

अध्यक्ष पदाच्या शर्यतीत खर्गे आघाडीवर आहेत. जी-२३ गटातील पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी तसेच भूपिंदर हुड्डा यांनी अध्यक्षपदासाठी खर्गेंच्या उमेदवारीला समर्थन दिले आहे. 'एक नेता, एक पद' या सुत्रानूसार काँग्रेस अध्यक्ष बनण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. परंतु, गहलोत समर्थकांच्या बंडानंतर गांधी परिवाराचे विश्वासू , दलित नेते खर्गे यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आले. खर्गे यांचे नाव समोर येताच दिग्विजय सिंह यांनी माघार घेतली. १९ ऑक्टोबरला काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT