Latest

रवींद्र चव्हाण मंत्री होऊन दोन महिने उलटले, तरी खड्डे जैसे थे ?; दीपेश म्हात्रेंचा पलटवार

अविनाश सुतार

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर ७२ तासांत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येतील, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती. मात्र, मंत्री होऊन दोन महिने उलटले तरी अजूनही खड्डे जैसे थे कसे? असा प्रश्न उपस्थित करत तीन वेळा आमदार झालेल्या चव्हाणांनी नेमके काय काम केले?, असा पलटवार शिंदे गटाचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर केला.

रविवारी सकाळी झालेल्या एका खासगी शाळेच्या कार्यक्रमात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खड्डेमय रस्त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याची चर्चा शहरात सुरू होती. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी म्हात्रे यांनी चव्हाणांना तुम्ही विकास कामे करण्यास कमी पडला असून स्वतःची पापे झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप -प्रत्यारोप करू नका. फडणवीस आणि शिंदे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत असून झारीतल्या शुक्राचार्यांनी आरोप करू नये. आरोप करण्यापेक्षा कामे करा. गेली दोन वर्षे तर आमदारांनी आरोप करण्यातच दिवस घालवले आहेत, अशी टीका म्हात्रे यांनी केली.

विशेष म्हणजे गुवाहटीवरून येताना ते मुख्यमंत्र्यांच्या शेजारीच बसले होते. तेव्हा तरी त्यांच्या कानात रस्ते करा, असे सांगायला हवे होते, असे म्हात्रे म्हणाले. अधिकारी काम करत नसल्याचा आरोप ते सातत्याने करत असतात. अधिकाऱ्यांकडून काम करून घ्यावे लागते. प्रेमाने सांगितले तर अधिकारी काम करतात. त्यांच्याकडून काम करून घेता आले पाहिजे, असेही म्हात्रे म्हणाले.

दरम्यान, शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन दोन महिने उलटले आहेत. भाजपच्या मंत्र्यांकडून थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केले जात आहेत. यावरून विद्यमान सरकारमध्ये तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांवरून थेट एका मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणे, ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT