Latest

मराठ्यांनो राजकारणाच्या नादाला लागून वाटोळे करुन घेऊ नका: मनोज जरांगे

अविनाश सुतार

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: खूप दिवसांनी मराठा समाज एक झाला आहे. मराठ्यांनो राजकारणाच्या नादाला लागून आपल्या जीवनाचे वाटोळे करुन घेवू नका. आरक्षणासाठी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी आपली एकजूट महत्वाची आहे. निवडणुकीत हजार दोन हजारांसाठी कोणाच्या नादी लागू नका. माझ्यावर अनेक षड्यंत्र रचून हरविण्याचा प्रयत्न केला. पण मी हटलो नाही, मरेपर्यंत हटणारही नाही. सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर बसून आरक्षण घेतो, असा निर्धार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी व्यक्त केला. गौर येथे संवाद बैठकीत ते बोलत होते.

'
जरांगे पुढे म्हणाले की, सध्या आचारसंहिता असल्याने अधिक बोलता येणार नाही. न्यायालयीन आदेशाचा आदर करतो. जिथे जाईल तिथे समाज बांधवांची प्रचंड गर्दी होवून संवाद बैठकांचे सभेत रुपांतर व्हायला लागले आहे. मी सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय शांत बसणार नाही. घरावर नोटीशी लावल्या तरी मी कशालाच घाबरत नाही. यांच्या छाताडवर‌ बसून सगेसोयरे आरक्षण अंमलबजावणी करुन घेतल्याशिवाय त्यांना सोडणारच नाही.

कितीही डाव टाकू द्या, मेलो तरी हटणार नाही. तुम्ही हटू नका. एकजूट कायम ठेवा. येत्या ८ जूनला बीड जिल्ह्यातील नारायणगड येथील ९०० एकरावर मराठा बांधवांची रेकार्ड ब्रेक ऐतिहासिक सभा होणार आहे. त्या सभेला सर्व मराठ्यांनी हजर रहावे. मराठ्यांची ताकद दाखवूया.

दरम्यान, आरळ, आहेरवाडी, आलेगाव सवराते येथेही जोरदार संवाद बैठका घेण्यात आल्या. तर एरंडेश्वर, कात्नेश्वर, माटेगाव, देगाव फाटा, पूर्णा टी पाईंट, चुडावा येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने जरांगेंचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT