Latest

Dhruv Jurel : आयसीसी क्रमवारीत ध्रुव जुरेलची धमाकेदार एन्ट्री! सरफराज खानला झटका

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी क्रमवारीत टीम इंडियाचा नवा खेळाडू ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) याच्याबाबतीत काय होणार याची सर्वाधिक प्रतिक्षा होती. त्याचबरोबर सरफराजच्या मानांकनावरही नजरा खिळल्या होत्या. जुरेलने सर्वांना आनंद दिला आहे, तर सरफराजने निराशा केली आहे. ध्रुवने आयसीसी कसोटी क्रमवारीत शानदार एन्ट्री घेतली असून त्याचा जगातील टॉप 100 खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे. एवढेच नाही तर अनेक बड्या खेळाडूंना मागे टाकण्यात तो यशस्वी ठरला आहे.

ध्रुवचे चमकदार कसोटी पदार्पण (Dhruv Jurel)

ध्रुव जुरेलने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या पहिल्याच डावात त्याने इंग्लंडविरुद्ध 46 धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याला आपले अर्धशतक पूर्ण करण्यात यश आले नसले तरी आपली छाप सोडण्यात तो यशस्वी ठरला. यानंतर त्याने रांचीमध्ये भारतीय संघ अडचणीत असताना आपली प्रतिभा पुन्हा दाखवून दिली. जुरेलने रांची कसोटीच्या पहिल्या डावात 90 धावांची मौल्यवान खेळी केली. तर याच सामन्याच्या दुसऱ्या डावात विजयी लक्ष्य गाठताना त्याने नाबाद 39 धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून देऊनच मैदानातून परतला.

जुरेलची 39 स्थानांची झेप

आपली पहिली कसोटी खेळल्यानंतर जुरेलला (Dhruv Jurel) आयसीसी कसोटी क्रमवारी पहिल्या 100 फलंदाजांमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. मात्र रांची कसोटीतील मॅच विनिंग खेळीनंतर त्याने 39 स्थानांची झेप घेत थेट 69 वे स्थान मिळवले आहे. त्याचे रेटिंग सध्या 461 आहे. पुढच्या कसोटीतही त्याने याच पद्धतीने धावा केल्या तर तो लवकरच टॉप 50 खेळाडूंच्या यादीत सामील होऊ शकतो. केवळ दोन कसोटी खेळल्यानंतर त्याने वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर, काइल मेयर्स, दक्षिण आफ्रिकेचा मार्को जॅनसेन यांसारख्या खेळाडूंना मागे टाकले आहे.

सरफराज खान टॉप 100 मधून बाहेर

राजकोट कसोटीत पदार्पण करणाऱ्या सरफराज खानने आयसीसी कसोटी क्रमवारीत दमदार एंट्री केली होती. पण रांची कसोटीत तो जास्त धावा करू शकला नाही आणि गोल्डन डकचा बळी ठरला, त्यामुळे आता तो टॉप 100 च्या यादीतून बाहेर पडला आहे. पण धर्मशाला कसोटीतील त्याने दमदार प्रदर्शन केल्यास त्याला पुढील क्रमवारीत नक्कीच फायदा होईल.

SCROLL FOR NEXT