Latest

Devendra Fadnavis Nashik Daura : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याकडे नाशिककरांचे लक्ष

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या १० फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. महापालिकेच्या गत निवडणुकीत फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेत असल्याची घोषणा केली होती. नाशिककरांनीही त्यांना प्रतिसाद देत नाशिक महापालिकेची सत्ता भाजपच्या झोळीत टाकली होती. त्यानंतर फडणवीस यांनी केलेल्या निओ मेट्रोच्या घोषणेसह अनेक महत्त्वाकांक्षी योजनांना चालना मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यात नाशिककरांच्या हाती काय लागते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री नाशिकमध्ये येऊन गेले. ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्त उद्धव ठाकरे हेही दि. २२ व २३ जानेवारीला नाशिकमध्ये आले होते. त्यामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. फेब्रुवारीअखेर अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, लोकप्रतिनिधींकडून विकासकामांची उद‌्घाटने, भूमिपूजनांचा धडाका सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून फडणवीस शनिवारी (दि. १०) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्या अंतर्गत भाजपकडून विशेषत: भाजप आमदारांकडून अनेक कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. त्यातील तीन कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची तयारी फडणवीस यांनी दर्शविली आहे. त्या ठिकाणी ते दत्तक नाशिककरांसाठी काय घोषणा करतात, याविषयी उत्सुकता आहे.

मेळा बसस्थानकात होणार सभा

फडणवीस हे शनिवारी (दि. 10) दुपारी नाशिकमध्ये दाखल होतील. त्यानंतर गंगापूर रोड येथे जल परिषदेला हजेरी लावतील. महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण अकादमी येथे पोलिस चषक स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तेथून ते मेळा बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावतील. या दौऱ्यानिमित्त भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. विशेषत: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील इच्छुकांकडून जय्यत तयारी केली जात आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT