पुढारी ऑनलाईन डेस्क
डेन्मार्कमध्ये कोरोना स्थिती (Denmark Covid vaccination) नियंत्रणात आल्याने येथील कोरोना लसीकरण (Covid vaccination) थांबवण्यात आले आहे. यामुळे डेन्मार्क हा कोविड लसीकरण कार्यक्रम थांबवणारा जगातील पहिला देश बनला आहे. कोरोनाची लाट ओसरली आहे. तसेच येथे मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. यामुळे लसीकरण थांबवण्यात आल्याचे डेन्मार्कच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
"कोरोना विरोधातील लढाईत सुरु करण्यात आलेली व्यापक कोविड-१९ लसीकरण मोहीम आता राष्ट्रीय आरोग्य मंडळ थांबवत आहे." असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. १५ मे पासून लोकांना लसीसाठी बोलावले जाणार नाही. पण प्रत्येकजण लसीकरणाचा कोर्स पूर्ण करण्यास सक्षम असेल, असे सांगण्यात आले आहे.
डेन्मार्कमध्ये कोविड लसीकरण मोहीम २०२० मध्ये ख्रिसमसनंतर सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत सुमारे ४८ लाख नागरिकांचे लसीकरण (Denmark Covid vaccination) झाले आहे. तर ३६ लाखांहून अधिक लोकांनी बूस्टर डोस घेतला आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन व्हेरियंटची अनेक लोकांना लागण झाली. पण आता परिस्थिती नियंत्रणात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
"महामारी नियंत्रणात आल्याने रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील काही दिवसांत हे प्रमाण आणखी कमी होईल, अशी आशा राष्ट्रीय आरोग्य मंडळाने व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, डेन्मार्कमधील १२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ८९ टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे.
युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोलच्या आकडेवारीनुसार, डेन्मार्कमध्ये कोरोना रुग्णसंख्या ६५ टक्क्यांनी कमी झाली आहे. मृत्यूसंख्येतही घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.
डेन्मार्कमध्ये आतापर्यंत कोरोनाने ६,१३५ जणांचा बळी घेतला आहे. तर आतापर्यंत २९ लाख ६४ हजार ३३७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. येथे कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.
हे ही वाचा :