Latest

डेंग्यू : दक्षता आणि उपचार

अनुराधा कोरवी

डेंग्यूमध्ये वेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. अगदी बारीक तापापासून ते प्रचंड डोकेदुखी, अंगदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी अंगावर चट्टे उठणे, प्रचंड थकवा येणे, डोळ्यांच्या मागे खूप दुखणे, लसिका ग्रंथी मोठ्या होणे, कोरडा खोकला येणे… अशी अनेक लक्षणे दिसतात. डेंग्यूच्या तीव्र प्रकारात त्वचेखाली रक्तस्राव झाल्यासारखे बारीक ठिपके उठतात.

पाऊस सुरू झाला आहे. जागोजागी पाणी साचत आहे. माणसाचे आरोग्य बिघडवणारे डास अशा साचलेल्या पाण्यात वाढू लागले आहेत. आपल्या घरात किंवा घराबाहेर अंगणात जे स्वच्छ पाणी असते, त्यात वाढणाऱ्या आढळणाऱ्या 'इडिस इजिप्ती' प्रकारच्या डासांच्या मादीमार्फत डेंग्यूच्या विषाणूचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होतो. डासांच्या वाढत्या संख्येमुळे डेंग्यूची साथ वेगाने पसरू शकते. 'इंडिस इजिप्ती' हे रंगाने काळे असून त्यांच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. हे डास शक्यतो दिवसाच्या वेळी म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी चावा घेतात. डेंग्यू हा आजार डासांमार्फतच पसरतो. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रत्यक्ष संपर्कातून पसरत नाही.
डेंग्यू या आजारात तीव्र प्रमाणात हाडे दुखत असल्याने, त्याला 'हाडमोडी 'ताप' असेही म्हणतात.

सौम्य डेंग्यू ताप, डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (Dengue Hemorrhagic Fever) आणि अति गंभीर प्रकारचा डेंग्यू (Dengue Shock Syndrome) असे वैद्यकशास्त्राच्या परिभाषेत डेंग्यूचे तीन प्रकार असले तरी, सर्वसामान्यपणे डेंग्यूचे दोन प्रकार करता येतात. पहिला कमी तीव्रतेचा डेंग्यू आणि दुसरा तीव्र डेंग्यू. पहिल्या प्रकारात रुग्णाला ताप असतो आणि पुढील लक्षणांपैकी किमान दोन लक्षणे असतात. मळमळणे, उलट्या येणे, अंगावर चट्टे (Rash) उठणे, अंगदुखी, रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होणे आणि डेंग्यूची चाचणी सकारात्मक येणे.

तीव्र प्रकारच्या डेंग्यूमध्ये वरीलपैकी अनेक लक्षणे असतात आणि त्याबरोबर काही धोक्याची लक्षणे दिसतात. जसे की पोटात खूप दुखणे, उलटी न थांबणे, छातीच्या पोकळीत पाणी होणे, पोटात पाणी होणे, श्लेष्मल स्तरातून रक्तस्राव होणे. प्रचंड थकवा येणे, अस्वस्थपणा जाणवणे, रक्तातील प्लेटलेटस् कमी होणे.

तीव्र प्रकारच्या डेंग्यूच्या रुग्णांना तातडीने उपचार केले नाहीत तर, प्लेटलेटस्ची संख्या झपाट्याने कमी होत जाते. यकृताचा आकार मोठा होतो. शरीरांतर्गत पोकळीत, जसे की छातीची पोकळी किंवा पोटाची पोकळी यामध्ये द्रव साचू लागतो. काही वेळा शरीरांतर्गत रक्तस्राव होतो. फुफ्फुसे, मेंदू, यकृत आधी अवयवात रक्तस्राव होऊ शकतो.

डेंग्यूमध्ये वेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. अगदी बारीक तापापासून ते प्रचंड डोकेदुखी, अंगदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी अंगावर चट्टे उठणे, प्रचंड थकवा येणे, डोळ्यांच्या मागे खूप दुखणे, लसिका ग्रंथी मोठ्या होणे, कोरडा खोकला येणे… अशी अनेक लक्षणे दिसतात. डेंग्यूच्या तीव्र प्रकारात त्वचेखाली ररक्तस्राव झाल्यासारखे बारीक ठिपके उठतात. डेंग्यू जेव्हा फुफ्फुसांवर आक्रमण करतो, तेव्हा सुरुवातीला मोठ्या श्वासनलिकांवर परिणाम होतो. खोकला येणे, दम लागणे, धाप लागणे या लक्षणांबरोबर रुग्णाच्या खोकल्यातून रक्त पडू शकते.

फुफ्फुसाच्या आवरणात पाणी होणे फुफ्फुसामध्ये न्यूमोनिया होणे, फुफ्फुसांमध्ये द्रव साचणे, फुफ्फुसांमध्ये रक्तस्राव होणे आणि एआरडीएस (- cute Respiratory Distress Syndrome) म्हणजे वायुकोशांमध्ये द्रव साचून ऑक्सिजनच्या देवाणघेवाणाची क्रिया बाधित होणे, असे परिणाम दिसून येतात. अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून विनाविलंब उपचार सुरू करावे लागतात.

डेंग्यूच्या रुग्णांनी आपली लक्षणे ताबडतोब ओळखून डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेतला, तर डेंग्यू आटोक्यात येतो. दळणवळणाची साधने वाढल्यामुळे लोकांचा प्रवास वाढला आहे. त्यामुळे कमी वेळात एक व्यक्ती मोठ्या पल्ल्याचा प्रवास करू शकते. थोडक्यात, प्रवासाच्या वेगाने डेंग्यू पसरत शकतो. प्रचंड लोकसंख्यावाढ आणि शहरीकरण, स्वच्छतेचा अभाव, डास नियंत्रण नीटपणे न होणे यामुळे डेंग्यू आटोक्यात येत नाही. जेव्हा एखादा डास डेंग्यूने बाधित रुग्णाच्या रक्ताचे शोषण करतो, तेव्हा त्या डासामार्फत डेंग्यूच्या विषाणूचा संसर्ग डासाच्या चाव्यातून निरोगी व्यक्तीमध्ये होतो.

डेंग्यूचा प्रसार करणारा डास स्वच्छ पाण्यात वाढतो. त्यामुळे घरात किंवा अंगणात वापरासाठी साठवलेले पाणी झाकण घालून ठेवावे. रिकामे डबे, टायरी, नारळाच्या करवंट्या, छोटी मोठी भांडी अशा कोणत्याही ठिकाणी पाणी साठू देऊ नये. डासांची वाढ होऊ नये किंवा पैदास होऊ नये यासाठी सार्वजनिक पातळीवर डास नियंत्रण कार्यक्रम अत्यंत काटेकोरपणे व्हायला हवा. तरच डेंग्यू आटोक्यात राहील.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT