Latest

नाशिककरांवर आता साथरोगांचेही ‘अवकाळी’ संकट, दक्षता घेण्याचे आवाहन

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-अवकाळी पावसाने जिल्हाभरातील कृषीक्षेत्रावर संक्रांत आणल्याने शेतकरी मेटाकुटीला आले असताना शहरी भागातही या 'अवकाळी'ने साथरोग संकट बळावण्याची भीती व्यक्त होत आहे. नाशकात डेंग्यू बळींची संख्या वाढतेय. त्यात पावसाने ठिकठिकाणी साचलेली पाण्याची डबकी डेंग्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डासांची पैदास वाढविणारी ठरण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर, पावसामुळे वातावरणात अचानक निर्माण झालेला गारवा, सर्दी, पडसे, व्हायरल फीव्हर यासारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढविणारा ठरण्याचा धोका असल्याने नाशिककरांनी दक्षता घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शहरात डेंग्यूचे थैमान सुरू आहे. डास निर्मूलनासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी जंतुनाशक, धूर फवारणी केवळ कागदावरच सुरू असल्याने डेंग्यूवर नियंत्रण मिळविणे अद्याप शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे नाशिक शहरातील डेंग्यू बाधितांचा आकडा साडेआठशेंवर पोहोचला आहे. प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी प्रलंबित असलेले अडीचशेहून अधिक रक्तनमुन्यांचे अहवाल प्राप्त होताच हा आकडा हजारावर जाण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबरमध्ये डेंग्यूमुळे नाशिकरोड विभागातील एका व्यावसायिकाचा बळी गेला. नोव्हेंबरमध्येही तिघांचा डेंग्यूसदृश आजाराने बळी घेतला. यात नाशिकरोड, नवीन नाशिक विभागातील अंबडमधील प्रत्येकी एक पुरुष, तर पंचवटीतील म्हसरूळ परिसरातील एका महिलेचा समावेश आहे. शहरातील डेंग्यूबाधितांच्या वाढत्या संख्येची थेट राज्य शासनाच्या आरोग्य विभागालाही दखल घ्यावी लागली असून, साथरोग नियंत्रणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला देण्यात आले. त्यामुळे वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर असताना अवकाळी पाऊस वैद्यकीय विभागाच्या चिंतेत भर घालणारा ठरला आहे. अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी साचलेली पाण्याची डबकी विशेषत: घरांच्या परिसरात, छतांवरील भंगार साहित्य, नारळाच्या करवंट्या, निकामी टायर्स, फुलदाण्यांमधील साचलेले पावसाचे पाणी डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांची उत्पत्ती वाढविण्यास कारणीभूत ठरतील.

सर्दी, खोकल्याचे रुग्णही वाढणार

गेल्या महिन्यांत शहरात व्हायरल फीव्हरची साथ आली होती. अंग दुखणे, डोके दुखणे, सलग आठवडाभरापेक्षाही अधिक काळ राहणारा ताप ही व्हायरल फीव्हरची लक्षणे होती. अवकाळी पावसामुळे व्हायरल फीव्हरची साथ परतण्याचा धोका आहे. सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्येही वाढ होऊ शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अवकाळी पावसामुळे साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या डासांची पैदास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घर व परिसरात साचलेली पाण्याची डबकी वाहती करावीत. भांड्यांमध्ये, फुलदाणीत आठवडाभरापेक्षा अधिक पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्दी, पडसे होऊ नये यासाठी गरम कपड्यांचा वापर करावा.

– डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, मनपा

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT