Latest

संजय राऊत यांच्या विरोधात ॲट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

अमृता चौगुले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अटकेवरुन सध्या राज्यात रणकंदन सुरु आहे. मुंबई पोलिसांनी राणा दांम्पत्याला अटक केल्यानंतर शिवसेना नेतृत्वाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये बोलताना, मातोश्रीसमोर आंदोलन करायला आल्यास वीस फुट खड्ड्यात गाडले जाल असे वक्तव्य केले होते.

दरम्‍यान, अशी भाषा करणारे शिवेसना नेते संजय राऊत यांच्यावर १५३(ए), २९४, ५०६ या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा, असे निवेदन युवा स्वाभिमानी संघटनेने नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहे.

या वक्तव्याची दखल घेत युवा स्वाभिमानी पक्षाच्या एका शिष्ठमंडळाने मंगळवारी (दि. 26) नागपूर पोलीस आयुक्त अमितेष कुमार यांची भेट घेतली. आणि तक्रारीसोबत संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ असलेला पेन ड्राईव्हही नागपूर पोलिसांना दिला आहे.

अनुसूचित जातीच्या असणाऱ्या खासदार नवनीत रवी राणा यांना जातीवाचक शिवीगाळ व जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्‍यामूळे संजय राऊत यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे अभिवचन दिले. यावेळी ॲड. दीप मिश्रा, जितू दुधाने, विनोद गुहे व सचिन भेंडे उपस्थित होते.

असे केले वक्तव्य

शिवसेनेच्या नादाला लागण्यापूर्वी आपल्या गोवऱ्या स्माशानात रचून यावे. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका नाहीतर २० फूट खड्ड्यात गाडले जाल. तुम्ही पुन्हा अमरावतीतून लोकसभेत जाऊन दाखवा. स्वतःमध्ये लढायची ताकद नाही म्हणून अशा या शिखंडीना पुढे केले जात आहे असे राऊत म्हणाले होते.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT