Latest

नगर-कल्याण महामार्गावरील अपघातात तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक

अमृता चौगुले

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  उत्तर पुणे जिल्ह्यात महत्त्वाचे शैक्षणिक आणि व्यापारी केंद्र असलेल्या ओतूर (ता. जुन्नर)जवळील डुंबरवाडी टोलनाका ते माळशेज घाट अंतरावरील नगर-कल्याण महामार्गावर रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या अपघातांमध्ये तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असून, ही चिंतेची बाब आहे. काही दिवसांपूर्वी नगर-कल्याण महामार्गाचे रुंदीकरण तसेच मजबुतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे हा रस्ता चकचकीत झाला आहे.

रस्ता चांगला असल्याने चालकांकडून वाहनांचा वेग वाढविला जात असल्याने या रस्त्यावरून दुचाकी तसेच चारचाकी वाहने सुसाट धावत असतात. अतिवेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून, त्यात मुख्यत्वे दुचाकी व मालवाहतूक करणार्‍या पीक अप यांच्या अपघाताचे प्रमाण जास्त आहे. दुचाकी अपघात हे बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच युवकांकडून होत असून, वाहनाचा वेग तसेच मजबुतीकरणामुळे टणक झालेले रस्ते यामुळे दुचाकीचालक गंभीर जखमी अथवा कायम जायबंदी होण्याचे तसेच त्यांचा मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे.

गणेशोत्सवादरम्यान सहा जणांचा मृत्यू
नुकताच गणेशोत्सवादरम्यान काळवाडी येथील युवक, कोळमाथा (ओतूर) येथील एक महिला तसेच एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांना पीक वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर डिंगोरे येथे एका चारचाकी वाहनाने चिरडल्याने तीन शेतमजूर जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

युवकांनी कुटुंबाचा विचार करणे आवश्यक
घरातील कमावणारी कर्ती व्यक्ती निघून गेल्याने त्याच्यावर अवलंबून असलेले कुटुंब, आई-वडील, बहीण, भाऊ, लग्न झाले असेल तर पत्नी, मुले यांचे पुढे काय होणार? हा मोठा यक्षप्रश्न त्या कुटुंबासमोर उभा राहत आहे. रस्ते अपघातात होणार्‍या मृत्यूची मोठी संख्या पाहता वाहन चालविताना तरुणांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे हे नक्की.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT