Latest

न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे अभिप्रेत नाही : दादा भुसे

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवाजनतेची दिशाभूल करण्यासाठी त्यांचे रोज केविलवाणे प्रयत्न सुरू असतात. अध्यक्षांनी न्यायनिवाडा करताना कायदे, नियम आणि वस्तुस्थितीवर न्यायनिवाडा केला आहे. न्यायनिवाड्याला दोन बाजू असू शकतात. ज्याला मान्य नाही, त्याला दाद मागण्याचा अधिकार आहे. परंतु जनतेत संभ्रम करणे आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही, असा टोला सार्वजनिक बांधकाममंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

नाशिकला 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या समारोपाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दादा भुसे बोलत होते. ते म्हणाले की, तुम्ही उद्या सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यांच्यावरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण करणार का? असा सवाल दादा भुसे यांनी उपस्थित केला. या अगोदरही उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे उचित नसल्याचेदेखील ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही. या देशात उद्योगपतींची कर्ज माफ होतात. पण शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाही. देशात चुकीचे आर्थिक धोरण राबवले जात आहे, अशी टीका केली. यावर दादा भुसे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांकडे लक्ष आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अशा अनेक योजना राबवण्यात येत आहे.

जागतिक गुंतवणूक वाढणार

मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर गेले आहेत. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावर दादा भुसे यांनी विचारले असता ते म्हणाले की, विरोधकांच्या पोटात आता गोळा उठला आहे. महाराष्ट्रात विकासकामांचे जे प्रकल्प सुरू आहेत, ते बघून जागतिक पातळीवरील गुंतवणूक होईल. दावोसवरून आल्यानंतर किती हजारो कोटींचे करार झाले, याची माहिती मुख्यमंत्री देतील. त्याअगोदरच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आपल्या राज्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी विरोधक खालच्या पातळीवर उतरल्याची टीका त्यांनी केली.

जितेंद्र आव्हाड यांनी राम कोणत्या जातीचे होते, ते बहुजन होते की नाही आदी मुद्दांवर भाष्य केल्याप्रकरणी दादा भुसे यांनी मतांच्या लाचारीसाठी माणूस किती खालच्या पातळीवर जातो. यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. यांची फक्त सुंता बाकी राहिलीय, अशी टीका केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT