Latest

Cyrus Mistry car accident | सायरस मिस्त्रींच्या मृत्यूला अनाहिता पंडोले जबाबदार, १५२ पानांचे आरोपपत्र दाखल

दीपक दि. भांदिगरे

पालघर : पुढारी वृत्तसेवा; टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात (Cyrus Mistry car accident) मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनाहिता पंडोले यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. १५२ पानी हे आरोपपत्र आहे. अपघाताच्या वेळी डॉ. पंडोले गाडी चालवत होत्या. ४ सप्टेंबर २०२२ रोजी पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सूर्या नदी ओव्हरब्रिजजवळ झालेल्या मर्सिडीज बेंझ कारच्या या अपघातात सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला होता.

डहाणू सत्र न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात असे म्हटले आहे की, ज्या दिवशी दुपारी २.३४ वाजता अपघात झाला तेव्हा अनाहिता गाडी चालवत होत्या, असे पाच साक्षीदारांचा जबाब घेतल्यानंतर समोर आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी डॉ. अनाहिता यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्याने आणि त्यांना आरामाची गरज असल्याने त्यांना अटक करण्यात आली नव्हती.

अनाहिता अजूनही त्यांच्या दुखापतीतून बऱ्या होत असल्याचा उल्लेख आरोपपत्रात केला केला आहे. २४ डिसेंबर २०२२ रोजी त्यांना त्यांच्या चर्चगेट येथील घरी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४१ (A) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र अनाहिता अजूनही दुखापतीतून बऱ्या होत नसल्याने त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

बेजबाबदारपणे गाडी चालवल्याचा ठपका

निष्काळजीपणा, बेजबाबदारपणे गाडी चालवणे, ओव्हरटेकिंग, लेनची शिस्त न पाळणे आणि ड्रायव्हरच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे यासह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अनाहिता यांच्याविरुद्ध ५ नोव्हेंबर रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता.
या आरोपपत्रात पुढे म्हटले की, अनाहिता यांनी त्यांचा सीट बेल्ट नीट लावला नव्हता किंवा त्यांनी त्यांच्या सहप्रवाशांचाही सीट बेल्ट लावला असल्याची खात्री केली नव्हती. आरोपपत्रात अनाहिता यांचा ड्रायव्हिंग करताना निष्काळजीपणा आणि त्यांचे धोकादायक ओव्हरटेकिंग मिस्त्री आणि जहांगीर यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. शिवाय त्यांचा पती डॅरियस आणि त्यांना स्वतःला दुखापत झाली होती. (Cyrus Mistry car accident)

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT