Latest

Cyclone Michaung | मिचाँग चक्रीवादळ कमकुवत, पण पूरग्रस्त चेन्नईत वीज, इंटरनेट सेवा ठप्पच

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : मिचाँग चक्रीवादळाने आंध्र प्रदेशातील बापतला जवळ किनारपट्टी ओलांडली आणि त्यानंतर ते आंध्रच्या मध्य किनारपट्टीवर 'डीप डिप्रेशन'मध्ये कमकुवत झाले आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी दिली. मिचाँग चक्रीवादळ तेलंगणाचा ईशान्य भाग आणि लगतच्या दक्षिण छत्तीसगड- ओडिशा किनारपट्टीचा दक्षिण भाग, आंध्र प्रदेशचा किनारी भाग खम्ममच्या पूर्व-ईशान्येस सुमारे ५० किमीवर 'डीप डिप्रेशन'मध्ये कमकुवत झाले आहेत. तसेच ते पुढील ६ तासांत कमी दाब क्षेत्रामध्ये आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. (Cyclone Michaung)

संंबंधित बातम्या 

दरम्यान, मिचौंग चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नई शहरात अजूनही पूरस्थिती आहे. शहरातील अनेक भागात ७२ तासांपासून वीज आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी खंडित आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी चेन्नई शहराच्या काही भागात विशेषत: उपनगरी भागात पाणी साचले आहे.

केंद्राकडून मदतीची मागणी

दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मिचाँग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात ५,०६० कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे.

"चेन्नई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील भागात अधिक नुकसान झाले आहे. रस्ते, पूल, सार्वजनिक इमारती या पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो लोकांच्या उदरनिर्वाहावर याचा परिणाम झाला आहे.' असे सांगत मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मदतीची मागणी केली आहे."

वादळी पावसाचा तडाखा

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अक्राळविक्राळ मिचाँग चक्रीवादळाने मंगळवारी आंध्र प्रदेशच्या किनार्‍यावरील बापतला येथे वादळाने दुपारी दीडच्या सुमारास जमिनीला स्पर्श केला आणि तुफानी वारे घोंघावत पुढे निघाले. बापतलाचा किनारा तामिळनाडूला लागून असून चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनार्‍यावरूनच पुढे सरकरत तिकडे गेल्याने तामिळनाडूलाही वादळी पावसाचा तडाखा बसला. येथे मोठी पडझड झाली आहे. (Cyclone Michaung)

काही भागात अतिवृष्टी

दरम्यान, गेल्या २४ तासांत आंध्र प्रदेशच्या किनारी भागात अतिवृष्टी झाली आहे. भीमाडोले येथे सर्वाधिक २४ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तामिळनाडूतील काही जिल्ह्यातही अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT