Latest

Cyclone Biparjoy | ‘बिपरजॉय’मुळे अलर्ट! कच्छ भागात १४४ लागू, लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : अत्यंत तीव्र चक्रीवादळ 'बिपरजॉय'च्या पार्श्वभूमीवर सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ पूर्व मध्य आणि शेजारील अरबी समुद्रात घोंघावत आहे. १५ जून रोजी दुपारपर्यंत मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) किनारपट्टी हे चक्रीवादळ ओलांडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी १ वाजता बिपरजॉय चक्रीवादळशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. (Cyclone Biparjoy)

कच्छ जिल्हा प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात कलम १४४ लागू करत जमावबंदी केली आहे. लोकांना किनाऱ्यावर जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातच्या दक्षिण आणि उत्तर किनार्‍यावरील मासेमारी थांबवण्यात आली आहे. 'बिपरजॉय' चक्रीवादळ सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी जिल्ह्यांतील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

देवभूमी द्वारका येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे १,३०० लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. ताज्या बुलेटिनमध्ये भारतीय हवामान विभाग (IMD) ने म्हटले आहे की 'अत्यंत तीव्र चक्रीवादळ' उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याची आणि १५ जून रोजी दुपारपर्यंत मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यानची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. या 'अत्यंत तीव्र चक्रीवादळामुळे प्रतिताशी १२५-१३५ ते १५० किमी वेगाने वारे वाहणार आहे.

चक्रीवादळ सध्या नेमके कुठे आहे?

अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ "बिपरजॉय" गेल्या ६ तासांमध्ये प्रतितास ७ किमी वेगाने उत्तरेकडे सरकले आणि आज, 12 जून रोजी भारतीय वेळेनुसार ८.३० वाजता पोरबंदरच्या नैऋत्येस सुमारे ३२० किमीवर, देवभूमी द्वारकेच्या नैऋत्येस ३६० किमी, जखाऊ बंदराच्या दक्षिणेस ४४० किमी, कच्छमधील नलियाच्या नैऋत्येस ४४० किमी आणि कराची (पाकिस्तान) च्या दक्षिणेस ६२० किमी अंतरावर घोंघावत होते. १४ जून रोजी सकाळपर्यंत ते उत्तरेकडे आणि नंतर उत्तर-पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. 15 जूनच्या दुपारपर्यंत जखाऊ बंदर (गुजरात) जवळ मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यानच्या सौराष्ट्र आणि कच्छ आणि लगतची पाकिस्तानची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. या दरम्यान प्रतिताशी १५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मुसळधार पावसाची शक्यता

अहमदाबादच्या काही भागात आज सोमवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. तर कच्छ, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि मोरबी या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

किनारपट्टीलगतच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा

कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. किनारपट्टीलगतच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जवळचे किनारे आणि मंदिरे बंद करण्यात आली आहेत. बिपरजॉय हे चक्रीवादळ मांडवी आणि कराची दरम्यानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.

अमित अरोरा, जिल्हाधिकारी, कच्छ

'बिपरजॉय' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईलाही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT