Latest

सायकलस्वारही वाहन चालकच : दिल्‍लीतील न्यायालयाने दिले ३८ लाख रुपयांची भरपाई देण्‍याचे आदेश

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सायकलस्‍वारही चालकच आहे. जेव्‍हा तो रस्‍त्‍यावर सायकल चालवत असतो तेव्‍हा त्‍याला वाहनचालक समजावे, असे स्‍पष्‍ट करत रस्‍ते अपघातात बळी पडलेल्‍या सायकलस्‍वाराच्‍या कुटुंबीयांना दिल्‍लीतील करकरडूमा न्‍यायालयाने ३८ लाख रुपयांची भरपाई देण्‍याचे आदेश दिले आहेत. विशेष म्‍हणजे, शनिवार ३ जून रोजी आंतरराष्‍ट्रीय सायकल दिन साजरा होत असतानाच न्‍यायालयाने आपला महत्त्‍वपूर्ण निकाल दिला.

काय होते प्रकरण ?

२५ वर्षीय देवेंद्र हा दिल्‍लीतील सोनिया विहार परिसरात गॅस सिलिंडरचा पुरवठा करायचा. २७ जुलै २०२१ रोजी कारने त्‍याच्‍या सायकला धडक दिली. या अपघातात देवेंद्र याचा मृत्यू झाला होता. त्‍याच्‍यावर आईसह चार लहान भावंडांच्या संगोपनाची जबाबदारी होती. त्‍याच्‍या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होती. देवेंद्रच्‍या नातेवाईकांनी नुकसान भरपाईसाठी न्‍यायालयात धाव घेतली होती.

नियमांच्‍या अंमलबजावणीची पहिली जबाबदारी सरकारची

या प्रकरणाची सुनावणी करकरडूमा न्‍यायालयातील वाहन अपघात दावा न्‍यायाधिकरणाचे न्‍यायाधीश हारुण प्रताप यांच्‍यासमोर झाली. ते म्‍हणाले की, दिल्लीच्या रस्त्यांवर सायकल चालवण्यासाठी काही नियम आहेत. त्याच्या अंमलबजावणीची पहिली जबाबदारी सरकारची आहे. शासनाने सायकल ट्रॅक बनविण्याचे काम यापूर्वीच सुरू केले आहे. परंतु, आतापर्यंत ही केवळ अर्धवट योजना आहे. ज्या ठिकाणी ट्रॅक बनवले आहेत, त्यांचा वापर केला जात नाही. वाहतूक पोलिसांनीही या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. याबाबत जनजागृती मोहीम राबविण्याची जबाबदारीही सरकारी विभागाची असे स्‍पष्‍ट करत देवेंद्र याच्‍या आईला ३८ लाख रुपयांची भरपाई देण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT