पुढारी ऑनलाईन डेस्क : CSK vs GT IPL Final : आयपीएलच्या 16 व्या हंगामाचा चॅम्पियनचा कोण होणार याचा निर्णय आज (दि. 28) लागणार आहे. योगायोगाने, अंतिम सामना त्याच दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे ज्यांच्यातील लढतीने यंदाच्या हंगामाची सुरुवात झाली. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचे लक्ष्य पाचव्यांदा चॅम्पियन बनण्याचे आहे, तर गुजरात टायटन्सला सलग दुसरे विजेतेपद जिंकून देण्यासाठी कर्णधार हार्दिक पंड्या आतुर झाला आहे. या दोन कर्णधारांपैकी कोण ट्रॉफी उंचावतो हे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातनंतर ठरवले जाईल.
आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरात टायटन्स अव्वल स्थानावर राहिला. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जचा संघ दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे पहिल्या क्वालीफायर सामन्यात हे दोन संघ एकमेकांना भीडले. मात्र, चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या क्वालिफायर 1 च्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या संघाला धोनीच्या सीएसकेने पराभवाची धूळ चारली. पण त्यानंतर जीटी संघाने जोरदार पुनरागमन करत दुस-या क्वालीफायरमध्ये मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत सलग दुस-यांदा अंतिम फेरी गाठली. गुजरात टायटन्सचे घरच्या मैदानावर उत्कृष्ट रेकॉर्ड आहे तर चेन्नई सुपर किंग्जला नरेंद्र मोदी स्टेडियमवर अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही.
सीएसके आणि जीटी या दोन्ही संघांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांचा एकही खेळाडू दुखापतग्रस्त नाही. त्याचबरोबर दोघांनीही आपापले मागील सामने जिंकले आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यातील प्लेईंग इलेव्हनमध्ये हे त्यांच्याकडून बदल होणार नाही असा अंदाज आहे. दरम्यान, अंतिम सामन्यात कोणता खेळाडू बाजी मारणार याकडे संर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जीटीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा सीएसकेच्या सलामी जोडीविरुद्ध चांगले रेकॉर्ड आहे. शमीने गेल्या तीन डावांत तीनदा कॉनवेला बाद केले आहे. पण ऋतुराज गायकवाड माघारी पाठवण्यात त्याला अजून यश आलेले नाही. गायकवाडचा शमी विरुद्ध स्ट्राईक रेट केवळ 69.69 आहे. अहमदाबादच्या मैदानावर शमीने 6.77 च्या इकॉनॉमी रेटने 17 विकेट घेतल्या आहेत.
टायटन्सचे मोहम्मद शमी (28 विकेट), राशिद खान (27 विकेट) आणि मोहित शर्मा (24 विकेट) हे पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल तीन गोलंदाज आहेत. चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांना या त्रिकुटाला सांभाळून खेळावे लागणार आहे.
शुभमन गिलचे वादळ रोखण्याची जबाबदारी सीएसकेच्या दीपक चहरवर असेल. चहर पॉवरप्लेमध्ये खूप यशस्वी झाला आहे आणि गिलला पॉवरप्लेमध्येच तंबूत पाठवण्यासाठी तो जोरदार प्रयत्न करेल. मात्र, हे तितके सोपे नाही कारण शुभमन गिल सध्या धमाकेदार फॉर्ममध्ये आहे. जीटीच्या या सलामीवीराने ऑरेंज कॅपवर कब्जा केला असून स्पर्धेत 800 धावांचा टप्पा पार केला आहे. चेन्नईला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांन गिलला झटपट बाद करणे गरजेचे आहे.
गुजरात टायटन्सच्या खेळाडूंना सीएसकेच्या महिष तीक्षानाला जपून खेळावे लागणाणार आहे. हा फिरकीपटू प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर प्रभावी ठरतो. आतापर्यंत या गोलंदाजाने सीएसकेचे होम ग्राऊंड चेपॉकवरच्या सात सामन्यांमध्ये तीन बळी घेतले आहेत. पण उर्वरित पाच सामन्यांमध्ये त्याने 8 विकेट्स घेतल्या आहेत. (CSK vs GT IPL Final)