पुढारी ऑनलाईन डेस्क : MS Dhoni World Record : आयपीएल 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ एकमेकांना भीडणार आहेत. आयपीएलमध्ये (IPL 2023) याआधी दोन्ही संघांमध्ये चार सामने झाले आहेत. त्यापैकी 3 सामन्यात गुजरात संघ तर 1 सामन्यात सीएसकेने बाजी मारली. सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) या सामन्यात मैदानावर उतरताच एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर करण्यास सज्ज झाला आहे.
महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 249 सामने खेळले आहेत. यातील 219 सामने सीएसकेतर्फे तर रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून 30 सामने खेळला आहे. आता गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात तो आयपीएलमधील 250 वा सामना खेळणार आहे. त्याच्यापूर्वी कोणीही आयपीएलमध्ये 250 सामने खेळलेले नाहीत. आयपीएलमध्ये 250 सामने खेळणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरणार आहे. धोनीनंतर रोहित शर्माने आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने 243 सामने खेळले आहेत.
महेंद्रसिंग धोनी : 249 सामने
रोहित शर्मा : 243 सामने
दिनेश कार्तिक : 242 सामने
विराट कोहली : 237 सामने
रवींद्र जडेजा : 225 सामने
शिखर धवन : 217 सामने
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्याचबरोबर धोनीची कर्णधार म्हणून ही 10वी आणि खेळाडू म्हणून 11वी फायनल आहे. धोनी मैदानावर पूर्णपणे शांत असतो. त्याने आपल्या चतुराईने सीएसकेसाठी अनेक सामने जिंकले आहेत. जर सीएसकेचा संघ गुजरातविरुद्ध जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला, तर सीएसकेचा संघ मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) पाच विजेतेपदांची बरोबरी करेल. (MS Dhoni World Record)
कर्णधारपदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळण्याशिवाय धोनीने तडाखेबाज फलंदाजीतून आपले कौशल्य दाखवले आहे. 249 सामन्यांमध्ये त्याने 5082 धावा फटकावल्या आहेत. 84 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याचे यष्टिरक्षण कौशल्यही अप्रतिम आहे. त्याने 141 झेल आणि 41 स्टंपिंग केले आहेत.
धोनीने (MS Dhoni) आतापर्यंत आयपीएलच्या सर्व हंगामात भाग घेतला आहे. त्याने 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली आणि 2015 पर्यंत ही जबाबदारी सांभाळली. त्यानंतर सीएसकेवरील बंदीच्या काळात तो 2016 आणि 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. त्यानंतर तो पुन्हा एकदा 2018 मध्ये चेन्नईचा कर्णधार म्हणून खेळताना दिसला. आयपीएल 2022 मध्ये, त्याने टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि जडेजाकडे नेतृत्व सोपवले होते. पण सलग पराभवांमुळे जडेजाला पायउतार व्हावे लागले आणि तेव्हापासून धोनी पुन्हा सीएसकेचा कर्णधार बनला आहे.
जर आपण आयपीएल 2023 मधील धोनीची कामगिरी पाहिली तर ती चांगली आहे. त्याला फारशी फलंदाजीची संधी मिळाली नाही. मात्र, जेव्हा-जेव्हा त्याला संधी मिळाली, तेव्हा त्याने आश्वासक फलंदाजी केली. धोनीने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 15 सामन्यांमध्ये 185 च्या स्ट्राइक रेटने 104 धावा केल्या आहेत.
धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली सीएसकेसाठी आयपीएलचा 16 वा हंगाम चांगला गेला. त्यांनी 14 पैकी 8 लीग सामने जिंकले आणि 5 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पॉइंट टेबलमध्ये हा संघ दुसऱ्या स्थानावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरला. त्यानंतर पहिल्या क्वालिफायरमध्ये सीएसकेने गुजरात टायटन्सचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.