Latest

MS Dhoni : धोनीबाबत धक्कादायक अहवाल समोर, ‘या’ नियमांचे उल्लंघन करण्यात आघाडीवर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : MS Dhoni : आयपीएल 2023 चा चालू हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गुजरात टायटन्सने 18 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. उर्वरित तीन जागांसाठी चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात लढत सुरू आहे. दरम्यान, भारताचा माजी दिग्गज खेळाडू आणि सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मोठ्या संकटात सापडला आहे. खरं तर, त्यासह अनेक सेलिब्रिटी व्यक्ती अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI) च्या जाहिरात नियमांचे उल्लंघन करताना आढळले आहेत.

ASCI चा एक अहवाल समोर आला आहे. ज्यात धोनी (MS Dhoni) जाहिरातींशी संबंधित सर्वाधिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींविरुद्ध तक्रारी वाढल्या आहेत आणि अनेकांनी ड्यू डिलिजेन्सची प्रक्रिया (एक प्रकारची तपास प्रक्रिया) केली नसल्याचे अहवालात म्हटले आहे. ASCI च्या अहवालानुसार, नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींमध्ये एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 803 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2023 मध्ये सेलिब्रिटींनी केलेल्या जाहिरातींमधील तक्रारींची संख्या 503 वर पोहोचली आहे. एक वर्षापूर्वी हा आकडा केवळ 55 होता.

ASCI कडून सांगण्यात आले की, सेलिब्रिटी व्यक्ती बरेच नियम तोडत आहेत. प्रसिद्ध व्यक्तींकडून एखाद्या उत्पादनाची जाहिरात केली जाते तेव्हा आवश्यक औपचारिकताही पूर्ण केल्या जात नाहीत. या बाबतीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. तो अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जो जाहिरातीपूर्वी योग्य परिश्रम करत नसल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.

2013 मध्ये एका जाहिरातीमुळे धोनी (MS Dhoni) वादात सापडला होता. त्यावेळी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका जाहिरातीत धोनी भगवान विष्णू यांच्या रुपात दिसला होता. मात्र, 2016 मध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले होते.

कॉमेडियन भुवन बाम याचाही नियमभंग करण्याच्या या प्रकरणात सहभाग आहे. त्याच्यावर नियमभंगाचे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. गेल्या आर्थिक वर्षात रिअल मनी गेमिंग उद्योगाच्या जाहिरातींमध्ये नियमांचे उल्लंघन शिक्षण क्षेत्राच्याही पलीकडे गेले आहे. जवळपास निम्मी प्रकरणे गेमिंग, शास्त्रीय शिक्षण, आरोग्य सेवा आणि वैयक्तिक काळजी या श्रेणीतील आहेत.

विशेष म्हणजे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार जर सेलिब्रिटी व्यक्ती एखाद्या जाहिरातीत दिसली तर त्याबाबतची सर्व माहिती त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. तथापि, 97 टक्के सेलिब्रिटी प्रकरणांमध्ये, ASCI योग्य परिश्रम प्रक्रियेचे पालन न केल्याचा पुरावा सादर करू शकले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT