पुणे : आधी जो कोणी उठायचा तो एक तर इंजिनिअर किंव्हा डॉक्टर होण्याकडे पळत होता. जागा कमी अन् उमेदवार जास्त झाल्याने अभियंता क्षेत्रात मरगळ आली होती. कोरोनानंतर बांधकाम क्षेत्रात 'अच्छे दिन' येत असून तसा अहवालही जाहीर झाला आहे. देशातील बांधकाम क्षेत्रामध्ये 2030 पर्यंत 10 कोटींहून अधिक नोकर्या उपलब्ध असतील, असा दावा 'नाईट फ्रँक इंडिया आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड सर्व्हेअर्स (आरआयसीएस) या संस्थांनी संयुक्तपणे हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतातील दुसर्या क्रमांकाचे आणि सर्वात मोठे रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र म्हणून बांधकाम विभागास ओळखले जात होते. या क्षेत्रात 7 कोटींहून अधिक कामगार आहेत. ही संख्या 2030 पर्यंत 10 कोटींच्या वर जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे.
संबधित बातम्या :
सध्या बांधकाम क्षेत्राचे मूल्य सध्या 650 बिलियन डॉलर्स एवढे असले, तरी हे वाढून 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स एवढे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा आकडा आणखी वाढवायचा असेल, तर देशात कुशल कामगारांची संख्या वाढवण्याची गरज असून अभियांत्रिकी शिक्षण देण्यावर भर दिला जात असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बांधकाम क्षेत्रात उपलब्ध असलेल्या 7 कोटी कामगारांपैकी तब्बल 81 टक्के कामगार अकुशल असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते. म्हणजेच देशात केवळ 19 टक्के कामगार कुशल असल्याचे दिसते. मोठ्या डेव्हलपर्स आणि कन्स्ट्रक्शन कंपन्यांकडून कुशल कामगारांची मागणी होत आहे. याबाबत सरकारने, शैक्षणिक संस्थांनी आणि प्रशिक्षण संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
देशाच्या राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्या आकडेवारीनुसार एकूण कामगारांपैकी (कुशल आणि अकुशल) 87 टक्के कामगार रिअल इस्टेट क्षेत्रात भरती होतात, तर उरलेले 13 टक्के कामगार हे इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राकडे वळतात.
देशातील 7 कोटी कर्मचार्यांपैकी 44 लाख कर्मचारी हे कुशल तंत्रज्ञ असून यामध्ये इंजिनिअर, टेक्निशियन आणि क्लार्क यांचा समावेश आहे. त्यापैकी 69 लाख कामगारांनी व्होकेशनल प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. उर्वरित कामगारांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण मिळाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा