चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे कोरपना तालुक्यातील नांदा गावाजवळील नाल्याला पूर आला आहे. आज (दि. १४) पोळ्याच्या दिवशी या नाल्यातून बैलबंडी काढत असताना बैलबंडी वाहून गेली. शेतकरी स्वतःचा जीव वाचवित नाल्याच्या बाहेर निघाला. ही घटना आज पोळ्याच्या दिवशी घडली. यानंतर सायंकाळी नांदा गावात पार पडलेल्या पोळ्यात नांदा नाल्यावरील पुलाच्या मागणीचे बॅनर झळकले.
कोरपना तालुक्यातील नांदा गावाजवळच नाला आहे. या नाल्यावर पूल नसल्याने पावसात नेहमी पूर येतो. या पुरात अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे या नाल्यावर पुलाची मागणी पंधरा वर्षापासून शेतकरी शेतमजूर नागरिक करीत आहेत. या करीता शासन दरबारी खेते घालत आहेत. वारंवार पुलाची मागणी करीत आहेत.
अनेक राजकीय नेते आमदार, खासदार व विविध पदाधिकारी यांना मागणी करीत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी केवळ निवडणुकीपुरता या मुद्याचा वापर केला आहे. तत्कालीन आमदार वामनराव चटप यांनी हा पूल मंजूर करून आणला होता. परंतू सत्तांतर झाले आणि पुलाची मागणी हवेत राहिली. तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक आमदार खासदाराणी अनेकादा नारळ फोडले मात्र पूल काही सुरू झाले नाही. मागील पंधरा दिवसापासून नाल्याच्या पलीकडील शेतात शेतकरी आपल्या शेतात जाऊ शकत नाही.
आज (दि. १४) गुरुवारी पोळ्याचा दिवस नांदा येथील शेतकरी किसान चौधरी हे आपल्या शेतातील बैलबंडी आणण्याकरिता गेले होते. बैलबंडी घेवून येत असताना बैलबंडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. शेतकरी कसा बसा आपला जीव मुठीत घेऊन पाण्यातून बाहेर पडला. मात्र बैल वाचू शकले नाहीत. दरवर्षीच्या पावसात ह्या घटना अनेकदा घडल्या आहेत. या नाल्यावर पुलाची मागणी करीत वारंवार निवेदन तक्रारी देऊन सुद्धा येथील पुलाची शेतकऱ्यांची मागणी पुर्ण झाली नाही. प्रशासन मोठ्या जीवितहानीची वाट बघत आहे असाच प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.
पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी वर्षभरातील सर्वात महत्त्वाचा सण असतो. या दिवशी वर्षभर शेतामध्ये राब राब राबणाऱ्या बैलांना सकाळपासून विविध शृंगार करून सजविले जाते. मात्र नांदा येथील नाल्याच्या पलीकडे असलेल्या शेतकऱ्यांना आपली जनावर नाल्याला पूर आल्यामुळे घरी सुद्धा आणता आली नाही. शेतकरी पाणी कमी होईल या आशेने नाल्याच्या पलीकडे वाट बघत उभे आहे असे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले आहे.
नांदा गावा शेजारील नाल्यावर पूल व्हावे ही मागणी पोळा सणात फलक लावून करण्यात आली. गावातील सुशिक्षित शेतकरी बांधवांनी ही मागणी केली आहे. आज पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. पंधरा विस वर्षापासुनच्या पुलाच्या मागणीचे फलक गावात पार पडलेल्या पोळा सणात झळकविण्यात आले. वारंवार होत असलेल्या पुलाच्या मागणीला आता पर्यन्त गाजर दाखविनाऱ्या लोकप्रतिनिधींना हा पूल कधी मंजूर करणार असा संतप्त सवाल करण्यात आला आहे.