नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखरच्या हवाला प्रकरणात नाव आलेल्या अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला अमेरिका दौरा करण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. शो ब्लास्ट एलएलसी नावाच्या कंपनीच्या प्रमोशनल कामासाठी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोला जाणार असल्याचे जॅकलीनने न्यायालयासमोर सांगितले होते.
कथित व्हिसा गैरव्यवहारात जॅकलीनचे नाव आलेले आहे तसेच प्रमोशनल कामे व्हिडिओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून होऊ शकतात, असे सांगत ईडीचे वकील सुरज राठी यांनी जॅकलीनच्या जामिनास विरोध केला. मात्र न्यायमूर्ती शैलेंद्र मलिक यांनी ७ ते २३ ऑगस्ट या कालावधीत जॅकलीनला अमेरिकेला जाण्याची परवानगी दिली. व्हिसासंदर्भातील काही मुद्दे असतील तर ते अमेरिकन राजदूतावास बघून घेईल. न्यायालयाचा याच्याशी संबंध येत नाही, अशी टिप्पणी न्यायमूर्ती मलिक यांनी केली. घोटाळ्यातील सुमारे सात कोटी रुपये सुकेशने जॅकलिनला दिले असल्याचा ईडीचा आरोप आहे.