पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या (Corona updates) ३ हजारांवर कायम आहे. गेल्या काही दिवसांत दैनंदिन ३ हजारांवर रुग्ण आढळून येत होते. आता गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३,६४१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या २०,२१९ वर पोहोचली असल्याची महिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
कोरोनामुळे आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील तीन रुग्णांचा समावेश आहे. तर दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ६.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. दर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.४५ टक्के आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
आम्हाला आता सतर्क राहण्याची गरज आहे. पण चिंता करण्याचे कारण नाही. सध्या देशात फैलाव असलेला ओमायक्रॉनच्या सब-व्हेरिएंटमुळे रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचे प्रमाण वाढलेले नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिली आहे.
याआधीच्या दिवशी एका दिवसांत कोरोनाचे ३,८२४ नवीन रुग्ण आढळून आले होते. ही सहा महिन्यांतील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या होती. गंभीर बाब म्हणजे जानेवारी २०२२ मधील तिसर्या लाटेनंतर पहिल्यांदाच गेल्या सात दिवसांत कोरोना संसर्ग वेगाने वाढला आहे. गेल्या आठवड्यात म्हणजेच २६ मार्च ते १ एप्रिल दरम्यान देशात सुमारे १८,४५० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. याआधीच्या आठवड्यातील रुग्णसंख्या ८,७८१ होती. पण गेल्या आठवड्यात रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. केरळ, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हरियाणातील रुग्णसंख्येत अधिक वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरात ३,३२३ रुग्ण आढळून आले आहेत. त्याआधीच्या आठवड्यातील रुग्णसंख्या १,९५६ एवढी होती. याचाच अर्थ राज्यातील रुग्णसंख्येत ६८ टक्के वाढ झाली आहे. केरळमध्ये गेल्या आठवड्यात ३,९६१ रुग्ण आढळून आले आहेत. तर त्याआधीच्या आठवड्यात १,३३३ रुग्णांची नोंद झाली होती. केरळमधील रुग्णसंख्येत तिपटीने वाढ दिसून येत आहे.
अलीकडील काही दिवसांत देशभरातील कोरोना रुग्णसंख्येत झालेली वाढ पाहता राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत वाढ केली आहे. दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडू, गोवा, हरियाणा या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ६६९ रुग्ण आढळले होते. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तामिळनाडूच्या आरोग्य विभागाने १० एप्रिलपासून दोन दिवस राज्यभरातील सर्व सरकारी रुग्णालयांची पाहणी करणार असल्याचे म्हटले आहे. जेणेकरून वाढती कोविड प्रकरणे आणि इतर संक्रमणांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सुविधा वाढवता येतील. तर दिल्ली सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. (Corona updates)
हे ही वाचा :