Latest

राज्यात काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल; वडेट्टीवार यांचा विश्वास

अमृता चौगुले

पुणे/कोरेगाव पार्क; पुढारी वृत्तसेवा : 'लांडग्यांच्या कळपात गेलेल्यांना लांडगेच सोडणार नाहीत. जनतेचा आता फक्त काँग्रेसवर विश्वास आहे. आमचे मित्रपक्षातील काहीजण सत्तेत सहभागी झाले आहेत. काँग्रेसला संधी निर्माण झाली आहे. या स्थितीत स्वबळावर राज्यात काँग्रेसची सत्ता येईल,' असा विश्वास विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. 'तर ज्यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप पंतप्रधानांनी केला, नंतर त्यांच्याच पाठीवर पंतप्रधान हात फिरवतात,' अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

पुण्यात काँग्रेस भवनला वडेट्टीवार यांनी रविवारी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चौधरी, संगीता तिवारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. वडेट्टीवार म्हणाले, 'काँग्रेस पक्षाला संपूर्ण देशामध्ये सध्या चांगले वातावरण असून, भाजप ज्या पद्धतीने धार्मिक ध—ुवीकरण करत आहे सध्या अनेक राज्यांचे अशांततेचे वातावरण आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडून या पक्षातील गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. लोकांना हे आवडलेले नाही. काँग्रेसवर लोकांचा विश्वास आहे.

पुणे शहरातून चार आमदार निवडून येतील. काँग्रेसची ताकद कमी असताना 44 आमदार निवडून आले होते.' शिंदे म्हणाले, 'शहरात राष्ट्रवादी, शिवसेना आंदोलन करत नाहीत. काँग्रेस हा आंदोलन करणारा एकमेव पक्ष आहे. मित्रपक्षांसाठी कायम शहर काँग्रेसवर अन्याय झाला आहे. शहरात मित्रपक्षाला अडचण होते म्हणून शहरातून मिळालेली मंत्रिपदेसुद्धा काढून घेण्यात आली.'

'मैत्रीचा दिलदार, तर सत्तेचा पक्का'

'मी अजित पवारांना 25 वर्षांपासून ओळखतो. दादा हा मैत्रीचा दिलदार माणूस आहे. पण सत्तेचाही पक्का आहे. त्यामुळे मैत्री आणि सत्ता त्यांना अबाधित राहो,' असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांना लगावला. वडेट्टीवार रविवारी पुणे दौर्‍यावर होते, त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'जनता निवडणुकीची वाट बघत आहे. लोक पक्षातून बाहेर गेले आहेत, पण त्याचा त्या पक्षावर परिणाम होईल असे अजिबात वाटत नाही. शिंदे सेनेचे फक्त दोनच खासदार निवडून येणार आहेत, हे सर्व्हे सांगत आहे.

अजित पवार गटाचेही तेच होणार आहे,' असे सांगतानाच भारतीय जनता पक्षाला चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात परमोच्च आनंद मिळतोय. काल परवा ज्यांना चोर म्हणत होते, त्याच टोळीत घुसून मलिदा खाण्याची प्रवृत्ती पुढे आली काय,' असा सवालही केला.अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. 'सरकारला दाखवण्यासाठी कोणतेही काम राहिले नाही. सर्व्हे त्यांच्या विरोधात जात आहेत. त्यामुळे दंगलीसारखे प्रकार घडू शकतात,' असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. जयंत पाटील भाजपामध्ये जाणार की नाही याबद्दल माहिती नसल्याचे म्हणाले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT