नागपूर : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेड येथे नागपुरातील सेवादलाचे ज्येष्ठ नेते के. के. उपाख्य कृष्णकुमार पांडे यांचा हृदवविकाराने मृत्यू झाला होता. सेवादल व काँगेसचे निष्ठावंत म्हणून कृष्णकुमार पांडे ओळखले जायचे. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर पक्षाने त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केल्याची भावना पांडे यांच्या कुटुंबियांकडून माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. आज काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने काँग्रेसचे बडे नेते नागपुरात येत असताना पक्षाने त्यांच्या कुटुंबियांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता पक्ष करणार का?, असा सवाल त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.
संबंधित बातम्या
कृष्णकुमार पांडे यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये राहुल गांधी यांच्यासह भारत जोडो यात्रेत चालत असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात त्यांचे निधन झाले. नागपुरात आल्यावर पांडे कुटुंबांचे सांत्वन करायला मी स्वतः जाईल, असे राहुल गांधी यांनी जाहीर केले होते. नांदेडमध्ये कृष्णकुमार पांडे यांच्या पार्थिवाला काँग्रेस पक्षाकडून श्रद्धांजली वाहिली जात असताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या कुटुंबाला २५ लाख रुपये मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी पांडे कुटुंबियांची अद्यापही भेट घेतली नाही. त्याचप्रमाणे पांडे कुटुंबियांना आर्थिक मदतही मिळाली नाही, अशी खंत पांडे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्त साधून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे नागपुरात आहेत. यानिमित्ताने तरी पक्ष आपला शब्द पाळणार का?, असा सवाल त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थित केला आहे. नितीन गडकरी, दिग्विजय सिंग, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे नेते येऊन गेले, मदतीचे आश्वासन दिले पण कुणीही काही मदत केली नाही. पक्षनेत्यांनी आपली बदनामी करु नये, अशा भावना देखील पांडे कुटुंबियांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या.