पुढारी ऑनलाइन डेस्क : Congress Meet : महाराष्ट्र काँग्रेस नेते आणि काँग्रेस हायकमांड यांच्यात मंगळवारी दिल्लीत बैठक झाली. संघटनेतील बदल आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबतही व्यापक चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी या विषयांवर चर्चा केली.
यावेळी काँग्रेसचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, पक्षाचे प्रदेश प्रभारी एच.के.पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. Congress Meet या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरच्या राज्यातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा बळकटी देण्यावर आणि भारतीय जनता पक्षाच्या जनादेशावरील हल्ल्यांना जोरदार राजकीय प्रत्युत्तर देण्यावर भर देण्यात आला.
बैठकीनंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारण बदलले आहे. शिवसेनेत आणि आता राष्ट्रवादीत फूट पडल्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी काँग्रेसची भूमिका काय असावी, या विषयावर बैठकीत चर्चा झाली. याशिवाय 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीबाबत राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष खरगे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.
बैठकीनंतर खर्गे म्हणाले की, भाजपने महाराष्ट्राचा अभिमान दुखावला आहे. याचे उत्तर काँग्रेस नक्कीच देईल. खरगे यांनी ट्विट केले आहे की, "भाजपने आपले 'वॉशिंग मशीन' वापरून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावण्याचे काम केले आहे. या राजकीय फसवणुकीला काँग्रेस पक्ष चोख प्रत्युत्तर देईल. महाराष्ट्रातील जनता सडेतोड राजकीय प्रत्युत्तर देईल.
ते म्हणाले, "आमचे नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्रातील जनतेला त्यांचेच सरकार परत मिळवून देतील. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आम्ही आमचे स्थान नेहमीच टिकवून ठेवले आहे. महाराष्ट्र आणि काँग्रेस यांच्यातील वैभवशाली नाते आम्ही आणखी दृढ करू.
महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून तिथे पक्ष मजबूत केला पाहिजे, असे मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून तिथे काँग्रेस पक्ष मजबूत करून जनतेचा आवाज बुलंद करण्यावर आमचा भर आहे. तिथे सत्तेवर बसलेल्या जनविरोधी सरकारचा पराभव होईल याची आम्ही सर्व मिळून खात्री करू."
मल्लिकार्जुन खर्गे यांनी 17-18 जुलै रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या पुढील एकता बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित केले आहे. विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात, काँग्रेस अध्यक्षांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 23 जून रोजी पाटणा येथे आयोजित केलेल्या विरोधी बैठकीत त्यांच्या सहभागाची आठवण करून दिली.
"आम्ही आमच्या लोकशाही राजकारणाला धोका निर्माण करणाऱ्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू शकलो आणि पुढची सार्वत्रिक निवडणूक एकजुटीने लढवण्याचे एकमताने मान्य केल्यामुळे ही बैठक खूप यशस्वी ठरली," असे खर्गे यांनी त्यांच्या निमंत्रण पत्रात म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्षांनी या नेत्यांना पुढे आठवण करून दिली की आम्ही जुलैमध्ये पुन्हा भेटण्याचे मान्य केले आहे.
हे ही वाचा :