Latest

कर्नाटक : सरकार काँग्रेसचे, चलती भाजप समर्थकांची

दिनेश चोरगे

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात काँग्रेस सरकार अस्तित्वात आले तरी भाजप कार्यकर्ते असणार्‍या वकिलांचीच चलती असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. यावरून काँग्रेसचे कार्यकर्ते असणार्‍या वकिलांमध्ये नाराजी पसरली आहे.
अनेक वर्षांनंतर राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. परिणामी, काँग्रेससाठी काम करणार्‍या वकिलांच्या आशा उंचावल्या होत्या. परंतु, सरकार अस्तित्वात येऊन दोन महिने उलटले तरी भाजप वकिलांचीच चलती असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस कार्यकर्ते वकिलांच्या मागण्याकडे मंत्री दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

राज्यात सरकार बदलताच अ‍ॅडव्होकेट जनरल, स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर, पब्लिक प्रॉसिक्युटर आणि विविध महामंडळांवरील वकिलांचीही बदली करण्यात येते. त्यानुसार काँग्रेस सत्तेवर येताच ज्येष्ठ वकील शशीकिरण शेट्टी, अ‍ॅडव्होकेट जनरल एस. ए. अहमद, बेळीयप्पा यांच्यासह अनेक सहायक अ‍ॅडव्होकेट जनरलांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यात अनेक भाजप समर्थक वकिलांचा समावेश आहे. यामुळे असमाधान व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कायदामंत्री एच. के. पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. यावर त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या यादीला मंजुरी दिल्याचे सांगितले. त्याचबरोबर केपीसीसी कायदा विभागाने याबाबत सुधारणा केल्यास त्यालाही मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांचे कायदा सल्लागार केपीसीसी वकील संघाचे अध्यक्ष ए. एस. पोनण्णा यांनी बैठक घेऊन चर्चा केली. भाजप वकील समर्थकांबाबत माहिती देण्याचे जाहीर केले.

बंगळूर महापालिकेतही

बंगळूर महापालिका, बंगळूर विकास प्राधिकरणावर वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्येही भाजप समर्थक वकिलांचा भरणा असल्याचे आढळून आले आहे. यामुळे काँग्रेस समर्थक वकिलांमध्ये नाराजी पसरली आहे.

     हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT