Latest

Kolhapur North Bypoll election : कोल्हापूर भाजपमुक्तच! ‘उत्तर’मधील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा मोठा विजय; भाजपचे सत्यजीत कदम पराभूत

दीपक दि. भांदिगरे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी (Kolhapur North Bypoll election) झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १८,९०१ मतांनी विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम पराभूत झाले आहेत. या विजयामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदाराचा मान जयश्री जाधव यांना मिळाला आहे. कोल्हापूरच्या जनतेने स्वाभिमान राखला असल्याची प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी विजयानंतर दिली आहे.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा (Kolhapur North Bypoll election) रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री यांना मतदारांनी विजयी केले आहे. या निवडणुकीकडे काँग्रेसचे नेते, पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असेच पाहिले गेले होते. जाधव यांच्या विजयामुळे सतेज पाटील यांची सरशी झाली आहे, तर होम टर्फवरच भाजपच्या उमदेवाराचा पराभव झाल्याने चंद्रकांत पाटील यांची मात्र पिछेहाट झालेली आहे.

२०१९ला झालेल्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचा चंद्रकांत जाधव यांनी पराभव केला होता. असे जरी असले तरी कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. ही जागा काँग्रेसला गेल्यानंतर शिवसेना आणि राजेश क्षीरसागर यांनी बंडखोरी न करता काँग्रेसला सहकार्य केले. शिवसेनेची मते फोडण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला, पण त्यात फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे जाधव यांच्या विजयात शिवसेनेने सिंहाचा वाटा उचलला. जोडीनेच राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनीही एक दिलाने प्रचार केल्याने जाधव यांचा विजय सुकर झाला.

महाडिक गटाची पिछेहाट सुरूच

भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम हे माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांचे नातलग आहेत. त्यामुळे महाडिक गट पूर्ण शक्तीने या निवडणुकीत उतरला होता. कदम यांच्या पराभवामुळे महाडिक गट जिल्ह्याच्या राजकारणात मागे फेकला गेला आहे. सतेज पाटील यांची महाडिक गटाविरुद्धच्या विजयाची मालिका या पोटनिवडणुकीतही सुरू राहिली आहे.

सतेज पाटील यांची यंत्रणा

पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रचाराची अवाढव्य यंत्रणा आहे. ही सर्व यंत्रणा जाधव यांच्या प्रचारासाठी कार्यरत होती. एका अर्थाने हा विजय सतेज पाटील यांच्या यंत्रणेचा आहे, असे म्हटले जात आहे.

भावनिक प्रचाराला साथ

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना अण्णा म्हटले जात होते. काँग्रसने सुरुवातीपासूनच 'अण्णांच्या माघारी आपली जबाबदारी' ही टॅगलाईन वापरली होती. चंद्रकांत जाधव यांची स्वच्छ प्रतिमा, कोरोना काळात केलेली कामे, सर्वच स्तरातील नागरिकांना दिलेला मदतीचा हात यामुळे त्यांच्याबद्दलच्या भावनिक लाटेचा त्यांच्या पत्नी जयश्री यांना झाला.

  • * पालकमंत्री सतेज पाटील यांची जिल्ह्यावरील पकड भक्कम
    * कोल्हापूर भाजपमुक्तच : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या होमपिचवरच भाजप गारद
    * महाडिक गटाच्या पराभवाची मालिका सुरूच
    * विजयात शिवसेनेचा सिंहाचा वाटा

कार्यकर्त्यांचा जल्लोष

जोतिबाच्या नावानं चांगभल म्हणत महिलांनी कपाळाला गुलाल लावला. अण्णांच्या माघारी आपली जबाबदारी…अशी घोषणा देत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जयश्री जाधव यांच्या विजयानंतर फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली.

राजेश क्षीरसागरांचा प्रभाव असलेल्या भागातही जयश्री जाधवांना 'लीड'

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला दिल्याने पोटनिवडणुकीत काय होणार? शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शब्द राखणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, कट्टर शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचा शब्द राखल्याचे प्रभागांमध्ये झालेल्या मतदानावरून दिसून येत आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांचा प्रभाव असलेल्या सिद्धार्थ नगर, बुधवार तालीम, खोलखंडोबा, शुक्रवार पेठ, शाहू उद्यान, शिवाजी चौक, शाहू टॉकीज, महाराणा प्रताप चौक, महानगरपालिका भागात जयश्री जाधव यांना लीड मिळाल्याचे दिसून आले आहे.

'अण्णांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेने दिलेला हा आशिर्वाद'

सर्व नेत्यांनी शब्द पाळला आहे. विजयामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचा सहभाग आहे. अण्णांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेने दिलेला हा आशिर्वाद आहे. मला जनतेची सेवा करायची आहे. जनतेचे हे अण्णांवरील प्रेम आहे. अण्णांच्या माघारी माझ्या स्वाभिमानी जनतेने आणि महाविकास आघाडीने माझी जबाबदारी खंबीरपणे निभावली, असे जयश्री जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT