Latest

काँग्रेसचे रायबरेलीसाठी भूपेश बघेल, अमेठीसाठी अशोक गेहलोत पक्ष निरीक्षक

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने भूपेश बघेल यांची रायबरेली मतदारसंघ (Raebareli Lok Sabha)  आणि अशोक गेहलोत यांची अमेठी मतदारसंघासाठी वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. तर  गांधी घराण्याशी निकटवर्तीय असलेले किशोरीलाल शर्मा यांना अमेठी मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून (Raebareli Lok Sabha)  उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवली नसती तर त्यांना पंतप्रधानपदाचे गंभीर उमेदवार मानले गेले नसते. शिवाय राहुल हे प्रचार सभांतून सातत्याने मोदी यांना लक्ष्य करत आहेत. भारतीय राजकारणात आजही उत्तर प्रदेशचे महत्त्व अबाधित आहे. म्हणूनच मोदी यांनीही दोन वेळा वाराणसी मतदारसंघातून आतापर्यंत निवडणूक लढवली आहे. देशात आतापर्यंत झालेल्या पंधरा पंतप्रधानांपैकी नऊ जणांनी उत्तर प्रदेशातील मतदारसंघांतून निवडणूक जिंकली आहे.

अमेठीच्या तुलनेत रायबरेली सुरक्षित मतदारसंघ

राहुल यांचे आजोबा फिरोज गांधी यांच्याप्रमाणेच इंदिरा गांधी आणि त्यानंतर सोनिया गांधी यांनीही रायबरेलीतून निवडणूक लढवली होती. खरे तर खुद्द राहुल हेही तीनदा अमेठीतून लोकसभेवर निवडून गेले होते. या पार्श्वभूमीवर, अमेठीच्या तुलनेत रायबरेली सुरक्षित मतदारसंघ आहे, असे काँग्रेसच्या धुरिणांना वाटते. सुरुवातीला काँग्रेसमध्ये असाही एक मतप्रवाह होता की, राहुल यांनी रायबरेलीतून आणि प्रियांका यांनी अमेठीतून निवडणूक लढवावी. तो विचार मागे पडला आणि हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून प्रियांका यांनी निवडणूक लढवावी, यावर चर्चा झाली. मात्र, प्रियांका यांनी त्यास नकार दिला. आता गांधी कुटुंबाची रणनीती अशी आहे की, राहुल हे वायनाडमधून जिंकले तर तेथे होणार्‍या पोटनिवडणुकीत प्रियांका यांना संधी द्यायची. तसे संकेत काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिले आहेत.

Raebareli Lok Sabha  : अमेठीतही तुल्यबळ लढत

अमेठीतून आता सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणार्‍या किशोरी लाल शर्मा यांना संधी देण्यात आली आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून सोनिया यांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना प्रदेश पातळीवरील पदाधिकारीपदी बढती देण्यात आली. अमेठी मतदारसंघातील सगळ्या खाचाखोचा त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहेत. त्यामुळे भाजपच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासाठी अमेठीतील सामना वाटतो तेवढा सोपा राहिलेला नाही.

रायबरेली लोकसभा मतदारसंघात येणार्‍या विधानसभेच्या पाच मतदारसंघांचा विचार केला तर चार ठिकाणी समाजवादी पक्षाचे आमदार निवडून आले आहेत. रायबरेली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या अदिती सिंह विजयी झाल्या होत्या. राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा काँग्रेस व समाजवादी पार्टीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. काँग्रेसचा परंपरागत मतदार आणि समाजवादी पक्षाचे सहकार्य यामुळे राहुल यांना रायबरेलीतूनही विजयाची चांगली संधी निर्माण झाली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT