Latest

मुंबईत नोकरी नाकारणाऱ्या गुजरातमधील कंपनीविरोधात तक्रार

अविनाश सुतार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: मुंबईतील गिरगाव येथील एका गुजराती कंपनीत मराठी उमेदवाराला नोकरी नाकारण्यात आली आहे. या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. तर कंपनीतील महिलेविरोधात 'आम्ही गिरगावकर' या संघटनेच्या वतीने वि. प. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत निवेदन दिले आहे. जानवी सरना असे त्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांना दिलेल्या निवेदनात काय म्हटले आहे?

  • वूमेनिया क्रिएशन्स" ही कंपनी गुजरातमधील सुरत येथून चालवली जाते.
  • ग्राफिक डिझाईनर पदासाठी जाहिरात
  • "मराठी पीपल आर नॉट वेलकम हिअर"
  • निक मराठी माणसाच्या स्वाभिमानाला नख लावण्याची हिम्मत कोठून येते?

या निवेदनात म्हटले आहे की, खेतवाडी ८ वी गल्ली, गिरगाव येथे "वूमेनिया क्रिएशन्स" ही कंपनी गुजरातमधील सुरत येथून चालवली जाते. या कंपनीतील जानवी सरना या महिलेने ग्राफिक डिझाईनर पदासाठी जाहिरात दिली होती. निवड झालेल्या उमेदवाराला वार्षिक ५ लाखांचे वेतन देण्याचे जाहिरातीत नमूद केले होते. त्याचबरोबर नोकरीची जागा, वेतन आणि अनुभव याबाबत माहिती दिल्यानंतर "मराठी पीपल आर नॉट वेलकम हिअर" असे ठळकपणे नमूद केलेले आहे.

यावर संताप व्यक्त केला जात आहे. आपल्याच मुंबईत येऊन आपल्या स्थानिक मराठी माणसाच्या स्वाभिमानाला नख लावण्याची हिम्मत कोठून येते? ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी विरुद्ध गुजराती हा वाद निर्माण करुन मराठी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा कुटील डाव आखला जात नाही ना?, असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, त्या महिलेने जाहिरात डिलीट केली आहे. परंतु जाहिरातीचा स्क्रीनशॉट काढून ठेवण्यात आला आहे. या जाहिरातीमुळे समस्त मराठी भाषिकांच्या तीव्र भावना समाजात उमटू लागल्या आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT