पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली दि 18, Coal Scam Case : छत्तीसगडमधील कोळसा घोटाळा प्रकरणी विशेष न्यायालय आता 26 जुलै रोजी शिक्षा सुनावणार आहे. काॅंग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र यांच्यासह इतर आरोपींवरील आरोप याआधीच सिद्ध झालेले आहेत. तत्कालीन संपुआ सरकारच्या कार्यकाळात हा घोटाळा झाला होता.
दोषींना जास्तीत जास्त शिक्षा दिली जावी, अशी विनंती सीबीआयकडून करण्यात आली तर प्रकृतीचे कारण देत कमी शिक्षा दिली जावी, असा युकि्तवाद दोषींकडून करण्यात आला. सर्व दोषींविरोधात ठोस पुरावे आहेत. अशा स्थितीत कमी शिक्षेसाठी प्रकृतीचे कारण योग्य असू शकत नाही, असे यावर सीबीआयकडून सांगण्यात आले. न्यायालयात 9 वर्षे सुनावणी चालली होती.
या काळात दोषींनी प्रताडना सहन केली आहे. अधिकारी तर दिल्लीत राहतात पण दोषी अन्य राज्यांत राहतात, असे दोषींच्या वकिलांकडून सांगण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर 26 जुलैला शिक्षा सुनावली जाईल, असे न्यायालयाने सांगितले.