पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यात दिवाळी सणाला प्रारंभ झाला असून, सगळीकडे सणाची धामधुम सुरू आहे. या निमित्त सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१०) तिरूमला येथे सहकुटुंब तिरूपती बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कुटुंबातील सदस्यांसोबत बालाजीचे भक्तीभावाने दर्शन घेत, अभिषेक घातला आहे. अशी माहिती स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत 'X' सोशल मीडीया अकाऊंटवरून दिली आहे. (CM Eknath Shinde)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिरूपती बालाजी चरणी नतमस्तक झाले. यावेळी शिंदे यांनी राज्यातील जनतेला सुखी समाधानी, ठेवण्याचे मागणे बालाजीकडे मागितले आहे. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबातील पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे तसेच नातू रुद्रांश सदस्य होते. तसेच तिरुपती देवस्थानाचे अध्यक्ष भुमना करुणाकर रेड्डी देखील यावेळी उपस्थित होते. (CM Eknath Shinde)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान -2023' अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी (दि. ८) प्रदूषणमुक्त सण साजरे करण्याचा संकल्प करण्याची शपथ दिली. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते. प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. राज्यातील वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यावेळी केले होते.