Latest

Chiplun Flood : चिपळुणात 5 हजार वाहनांना पुराचा तडाखा

रणजित गायकवाड

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : Chiplun Flood चिपळुणात 22 व 23 जुलै रोजी आलेल्या महापुरामध्ये खेर्डी व चिपळूण परिसरातील तब्बल पाच हजार वाहनांना मोठा फटका बसला आहे. त्यातील हजारो वाहने निकामी झाली आहेत. त्यामुळे मालमत्तेचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे.

या वर्षीच्या महापुराने 2005 च्या महापुराचा उच्चांक मोडला. अनेक ठिकाणी दहा ते वीस फुटांहून अधिक उंचीवर पुराचे पाणी होते. या शिवाय आजवर कधीही ज्या भागात पाणी शिरले नाही अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात महापुराचा तडाखा बसला. यामध्ये रावतळे, मार्कंडी, गुहागर बायपास, बुरुमतळी, डीबीजे महाविद्यालयासमोर परशुरामनगर, बहादूरशेख चौक या ठिकाणी पाणी भरले. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने पार्किंग किंवा रस्त्यावर उभी असलेली अनेक वाहने या पाण्याबरोबर वाहत गेली.

अधिक वाचा :

त्यामुळे दुचाकी आणि आलिशान कार यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. खेर्डीच्या दुतर्फा अनेक वाहने रस्त्याच्या कडेला पूर ओसरल्यानंतर अडकून पडल्याचे चित्र होते. त्याच पद्धतीने वाशिष्ठी नदीकिनारी देखील अनेक वाहने वाहत जाताना अडकल्याचे निदर्शनास आले. विशेषकरून खेर्डी, मार्कंडी, काविळतळी, गोवळकोट रोड या भागात मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले आहे तर अनेक इमारतींच्या पार्किंगमधील वाहनेदेखील पाणी शिरल्याने बंद आहेत.

शहरातील मोटारसायकलची गॅरेज व कार गॅरेजमध्ये सध्या अशा वाहनांची संख्या मोठी असून दुरूस्तीसाठी लोकांना प्रतिक्षा करावी लागत आहे तर ज्या लोकांच्या वाहनांचा विमा आहे अशी वाहने रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी संबंधित कंपन्या वाहने टोईंग करून नेत आहेत. खेर्डी, चिपळूण परिसरातील 4 हजार 796 वाहने पुरामुळे नादुरूस्त झाली आहेत तर काही निकामी झाली आहेत. यामध्ये मोटारसायकल, आलिशान कार, बस, जीप, ट्रक यांचा समावेश आहे. ज्या लोकांनी आपल्या वाहनांचा विमा उतरलेला नाही, त्यांचे या महापुरामुळे मोठे नुकसान होणार आहे.

19 हजार 301 पंचनामे पूर्ण

चिपळूण व खेर्डी परिसरात 19 हजार 301 पंचनामे पूर्ण झाले असून 8 हजार 325 घरांचे नुकसान झाले आहे. 4 हजार 292 दुकानांना पुराचा फटका बसला असून 374 सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे तर 219 गोठे महापुरात उद्ध्वस्त झाले असल्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT