Latest

Omicron Variant BF.7 | चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक : लसीकरणानंतरही होणारा ‘हा’ व्हॅरिएंट ठरतोय घातक

मोहसीन मुल्ला

बीजिंग, पुढारी ऑनलाईन डेस्क :  (Omicron Variant BF.7) चीनमध्ये निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. चीनमधील रुग्णालये, स्मशानभूमी अक्षरश: भरून गेलेल्या आहेत. दररोज १० हजारांवर लोकांना कोरोना होऊ लागलेला आहे. साथरोगांचे तज्ज्ञ एरिक फिगल डिंग यांनी चीनच्या ६० टक्के लोकसंख्येला कोरोना होऊ शकतो आणि अनेकांचा मृत्यू होऊ शकतो असे भाकित वर्तवले आहे.

चीनमध्ये कोणता व्हॅरिएंट फैलावत आहे?

२०२१ च्या अखेरीस कोरोनाचा ओमायक्रॉन हा व्हॅरिएंट निदर्शनास आला. ओमायक्रॉनचे त्यानंतर विविध सबव्हॅरिएंट पसरू लागले. सध्या चीनमध्ये पसरत असलेला व्हॅरिएंट हा BF.7 हा आहे.

BF.7 म्हणजेच BA.5.2.1.7 हा व्हॅरिएंट ओमायक्रॉनचा सबव्हॅरिएंट आहे. ओमायक्रॉनचे जेवढे व्हॅरिएंट आहेत, त्यातील सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हॅरिएंट BF.7 हा आहे. या व्हॅरिएंटचा इन्क्युबेशन काळही कमी आहे. पूर्वी कोरोना होऊन गेला असेल आणि लस घेतली असली तरी हा आजार होऊ शकतो. ज्या व्यक्तीला BF.7 या विषाणूची बाधा होते, त्यापासून १० ते १८.६ लोकांना कोरोना होऊ शकतो. याला रिप्रोडक्शन नंबर असे म्हटले जाते. BF.7मध्ये रिप्रोडक्शन नंबर सर्वांत जास्त आहे. (Omicron Variant BF.7)

Omicron Variant BF.7 का ठरतोय घातक?

BF.7 मध्ये स्पाईक प्रोटिनमध्ये सर्वाधिक म्युटेशन झालेले आहेत, त्यामुळे पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांनाही B.7ची लागण होते.
व्हायरसमध्ये म्युटेशन होणे अगदी नैसर्गिक बाब असते. त्यामुळे कोरोना व्हायरसमध्येही सतत म्युटेशन होत असतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जगभरात जो थैमान घातला होता, त्याचे कारण डेल्टा व्हॅरिएंट हे होते. त्यानंतरची लाट ओमायक्रॉनमुळे आली.
ओमायक्रॉनमध्ये बदल होत नवे सब व्हॅरिंएंट जन्माला येत आहेत. हे व्हॅरिएंट लसीकरणालाही जुमानत नाहीत, असे संशोधकांनी निदर्शनास आणले आहे.

Omicron Variant BF.7 चीनमध्येच थैमान का?

BF.7 हा व्हॅरिएंट बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क, भारत, अमेरिका या देशांतही दिसून आला आहे. पण चीन वगळता इतर देशांत BF.7 हा व्हॅरिएंट स्थीर आहे. चीनमध्ये लोकसंख्येत कोरोनाबद्दलची रोगप्रतिकार क्षमता आणि व्हॅक्सिनची परिणामकारकता कमी असल्याने, असे घडत असेल असे संशोधकांना वाटते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT