Latest

China-India border dispute: अमेरिकेचा चीनला झटका : ‘अरुणाचल’ मुद्यावर भारताच्या समर्थनार्थ ‍‍‍संसदेत ठराव

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेने अरूणाचल प्रदेश आणि चीनला विभाजित करणारी मॅकमोहन रेषा (LAC) आंतरराष्ट्रीय सीमा मानली आहे. या मुद्यावर अमेरिकन संसदेत द्विपक्षीय ठराव मांडण्यात आला असून, त्यात अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे. चीन आणि भारताच्या सीमावादात आम्ही भारतासोबत असल्याचे म्हणत अमेरिकेने भारताच्या समर्थनार्थ पाऊल उचलेले आहे. हा प्रस्ताव खासदार बिल हैगर्टी आणि जेफ मर्कले यांनी अमेरिकेच्या संसदेत मांडला.

अमेरिकेने संसदेत मांडलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, चीन वारंवार हिंद प्रशांत महासागरामध्ये भारतासोबतच इतर देशांना आव्हान देत आहे. आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहे. या दोन्ही देशातील सीमेवरदेखील वारंवार चकमक सुरू आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने सामरिक भागीदारांच्या खांद्याला खांदा लावून विशेषत: भारतासोबत राहणे आवश्यक असल्याचे या प्रस्तावात नमूद केले आहे.

अमेरिकेची चीनच्या लष्करी कारवाईवर टीका

अमेरिकन संसदेच्या या द्विपक्षीय ठरावाने अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे. तसेच चीनच्या लष्करी कारवाईवर आणि LAC ची स्थिती बदलण्याच्या प्रयत्नांवर टीकाही केली आहे. भारत-अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याबाबत आणि क्वाडमधील सहकार्य वाढविण्याबाबतही या प्रस्तावात चर्चा करण्यात आली आहे.

चीनच्या भूतान दाव्यावरही टीका

अमेरिका अरुणाचल प्रदेशला चीनचा नव्हे तर भारताचा अविभाज्य भाग मानते, असे अमेरिकन संसदेत मांडण्यात आलेल्या द्विपक्षीय ठरावात म्हटले आहे. लष्करी ताकदीवर 'एलएसी'वरील परिस्थिती बदलण्याच्या चीनचे प्रयत्न, वादग्रस्त ठिकाणी चीनने गाव वसवणे आणि भारताचा अरुणाचल प्रदेश चीनने आपल्या नकाशात दाखवणे या सर्वांबाबत अमेरिकन खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच भूतानच्या सीमेवरील चीनच्या दाव्यावरही या प्रस्तावात टीका करण्यात आली आहे.

भारतासोबत तांत्रिक आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यावर भर

चीनच्या चिथावणीखोर कृतीविरोधात भारताने घेतलेल्या भूमिकेची प्रशंसा देखील  या ठरावात करण्यात आली आहे. यामुळे भारतासोबत तांत्रिक आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यावरही या प्रस्तावात भर देण्यात आला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT