Latest

पुणे बाजारात चिक्की गुळाचा गोडवा; भावही दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गूळवडी, पोळी, तीळपापडी तसेच लाडू तयार करण्यासाठी बाजारात चिक्की गुळाला मागणी वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मागणी अधिक असून घटलेले उत्पादन, उत्पादन खर्चासह वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे चिक्की गुळाचे भावही दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले आहेत.

गुलटेकडी मार्केट यार्डात दररोज पाचशे ते एक हजार बॉक्स गूळ दाखल होत असून त्याला घरगुती ग्राहकांसह मिठाईविक्रेते, कारखानदार, लघुउद्योगांकडून चांगली मागणी आहे. मार्केट यार्डातील गूळ बाजारात जिल्ह्यासह कराड, पाटण, सांगली येथून एक, अर्धा व पाव किलो अशा बॉक्स स्वरूपात चिक्की गुळाची आवक होते. यामध्ये दौंड तालुक्यातील केडगाव, दापोडी भागातून सर्वाधिक दोनशे ते अडीचशे बॉक्स बाजारात दाखल होत आहेत. गतवर्षी कोरोना आणि लॉकडाउनमुळे सणांवर मर्यादा आल्याने चिक्की गुळाला मागणी कमी होती.

सर्व व्यवहार सुरळीत

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असतानाही सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. तसेच, मिठाई विक्रेत्यांची दुकानेही खुली असल्याने चिक्की गुळाला मागणी चांगली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने यंदा चिक्की गुळाच्या भावात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात दाखल होत असलेला माल पुणे जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, भिवंडी येथे पाठविण्यात येत असल्याचे गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले.

संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर या गुळाचे उत्पादन घेण्याकडे शेतकरी वर्गाचा कल राहतो. या गुळामध्ये मऊ, चिकट व घट्टपणा जास्त असतो. हा गूळ काजू, शेंगदाणा, तीळ आदी पदार्थ घट्ट धरून ठेवतो. तसेच तो खायला अधिक गोड असल्याने गूळवडी, पोळी, तीळपापडी, लाडू करण्यासाठी त्याचा वापर अधिक होतो. खाद्यपदार्थांना एक वेगळी चव राहावी यासाठी गृहिणींकडून केशर, सुंठ तसेच वेलदोड्याचा वापर करण्यात येतो. या गुळाला फक्त संक्रांतीच्या काळातच मोठी मागणी असते.

''गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगली मागणी आहे. बाजारात तीस, दहा किलोंसह एक, अर्धा व पावकिलो स्वरूपात चिक्की गूळ उपलब्ध आहे. सध्या लघुउद्योजक, कारखानदारांकडून अधिक मागणी आहे. जानेवारी महिन्यात घरगुती ग्राहकांकडून मागणी वाढेल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनापासून वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे.''

                                                                                                                       – शशांक हापसे, गूळ व्यापारी, मार्केट यार्ड

''चिक्की गूळ वर्षभरातून एकदाच तयार केला जातो. त्यासाठी दर्जेदार ऊस राखून ठेवला जातो. संक्रांतीच्या आधी उत्पादनास सुरवात होते. 15 डिसेंबरपासून दहा जानेवारीपर्यंत बाजारात गूळ विक्रीसाठी पाठविण्यात येतो. सध्या दररोज दोनशे ते सव्वादोनशे बॉक्स तयार करण्यात येत आहेत.''

                                                                                                          – श्रीकृष्ण भांडवलकर, गूळ उत्पादक, दापोडी, दौंड

चिक्की गुळाचे दर

  • तीस किलो – 4 हजार 100 ते 4 हजार 300
  • दहा किलो – 4 हजार ते 4 हजार 400
  • एक किलो – 43 ते 48
  • अर्धा किलो – 45 ते 50
  • पाव किलो – 47 ते 52

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT