Latest

मुख्यमंत्री शिंदे ९६ व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक

backup backup

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी वर्धा अर्थात महात्मा गांधी साहित्य नगरी सज्ज होत आहे. स्वावलंबी मैदानावर ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान हा मराठी सारस्वतांचा मेळा भरणार असून संमेलनाचे उद्घाटन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते होणार असून समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. विदर्भ साहित्‍य संघाचे अध्‍यक्ष व ९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन आयोजन समितीचे समन्‍वयक प्रदीप दाते यांनी याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

उदघाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्‍याचे शिक्षण व भाषा मंत्री दीपक केसरकर प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थ‍ित राहतील. ज्‍येष्‍ठ साहित्यिक, निवृत्त न्‍यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर या संमेलनाचे अध्‍यक्ष तर माजी खासदार दत्ता मेघे हे स्‍वागताध्‍यक्ष आहेत. संमेलनाच्या मुख्‍य सभामंडपाला आचार्य विनोबा भावे यांचे तर मुख्‍य व्‍यासपीठाला प्राचार्य राम शेवाळकर यांचे नाव देण्‍यात आले आहे. शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला मावळते संमेलनाध्‍यक्ष भारत सासणे, ज्‍येष्‍ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्‍वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्‍वास, आमदार डॉ. विश्‍वजीत कदम, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तत्‍पूर्वी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी निघणार असून अखिल भारतीय महामंडळाच्‍या अध्‍यक्ष प्रा. उषा तांबे यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात येणार आहे.

रविवारी होणार समारोप

संमेलनाचा समारोप रविवार, ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यासह सांस्‍कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहणार आहे. यावेळी ज्‍येष्‍ठ साहित्यिक डॉ. म. रा. जोशी व प्रकाशक राजीव बर्वे यांचा विशेष सत्‍कार करण्‍यात येईल.

मुलाखत व मुक्‍त संवाद

शुक्रवार, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांची प्रकट मुलाखत मुक्‍ता पुणतांबेकर, विनोद सिरसाट व विवेक सावंत घेतील. याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता प्रसिद्ध मराठी सिनेदिग्‍दर्शक नागराज मंजुळे व कवी 'सौमित्र' किशोर कदम यांचा सहभाग असलेला 'मुक्‍त संवाद' हा कार्यक्रम होणार आहे. वर्ध्‍याचे जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले हे अध्‍यक्षस्‍थानी राहणार असून संवादक बालाजी सुतार राहतील.

ग्रंथप्रदर्शन व वाचन मंच

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथनगरीत भव्‍य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले असून यात एकुण २९० ग्रंथदालने राहणार आहेत. महाराष्‍ट्र, दिल्‍ली, गोवा येथील राजहंस, मॅजेस्टिक, मौज, पॉप्‍युलर, मेहता, रोहन, दिलीपराज, साधना इत्‍यादी प्रकाशनांची पुस्‍तके येथे विक्रीसाठी उपलब्‍ध राहतील. याशिवाय, वाचन मंच, बालसाहित्‍य मंच, बसोली ग्रुप व स्‍कुल ऑफ स्‍कॉलर्सतर्फे चित्रकाव्‍य प्रदर्शन इत्‍यादी भरगच्‍च कार्यक्रमांची मेजवानी मराठी रसिक, वाचकांना मिळणार आहे. यावेळी आयोजन समितीचे समन्‍वयक डॉ. रवींद्र शोभणे, प्रमुख कार्यवाह विलास मानेकर, प्रसिद्धी माध्‍यम प्रमुख अनिल गडेकर यांच्‍यासह विदर्भ साहित्‍य संघाचे पदाधिकारी उपस्‍थ‍ित होते.

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT