छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आज (शनिवार) सकाळी ९ वाजता अचानक फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात फुटली. यामुळे शहराच्या दिशेने होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या कामासाठी किमान १५ तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० व १४०० मि. मी. व्यासाच्या दोन्ही जलवाहिन्या कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे या जलवाहिण्या सतत फुटण्याची घटना घडत आहे. मागील आठवड्यात बिडकीन परिसरात छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याच्या कामादरम्यान जेसीबीचा धक्का लागून व्हॉल्व्ह फुटला होता. त्यामुळे ९ तास शहराचा पाणीपुरवठा बंद झाला होता. या खंडामुळे अजून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही.
अनेक भागाला अजूनही आठव्या, दहाव्या दिवशीच पाणी मिळत आहे. असे असतांना आज (शनिवारी) सकाळी ९ वाजता अचानक फारोळा 100 एमएलडी क्षमतेच्या पंप गृहापुढे मॅनीफोल्ड पाइप फुटल्याने पंप गृहात व मोटारीत पाणी गेले आहे. त्यामुळे ९ वाजता पंप बंद करून काम सुरू करण्यात आल्याची माहिती मनपा पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
दुरुस्ती १५ तास चालेल
फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात मॅनीफोल्ड जलवाहिनी फुटली आहे. यामुळे पंपागृहात व मोटारीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेले आहे. हे काम किचकट असल्याने त्यासाठी किमान १२ ते १५ तासांचा अवधी लागेल अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
पाण्याचे टप्पे दोन दिवस पुढे
शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात अचानक फुटल्याने शनिवारी सकाळी शहराच्या दिशेने होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. दुरुस्ती कामासाठी १५ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या खंडामुळे शहरातील जलकुंभ भरण्यासाठी किमान २० तासांपेक्षा अधिक कालावधी लागेल. त्यामुळे अनेक वसाहतींतील पाण्याचे टप्पे दोन दिवस पुढे गेले आहेत.
हेही वाचा :