Latest

छत्रपती संभाजीनगर : क्रांती चौकात दोन्ही शिवसेना आमने-सामने

निलेश पोतदार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे व महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची रॅली क्रांती चौकात एकमेकांसमोर आली. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खोके, गद्दाराच्या घोषणा दिल्या. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देशी दारूच्या बाटल्या उंचावत भिंगरी-भिंगरी घोषणा दिल्या. त्यावेळी महायुतीच्या राजेंद्र जंजाळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा विजय असो, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्या जात होत्‍या. दोन्ही बाजुंच्या गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्‍याने या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दरम्‍यान पोलिसांच्या मध्यस्‍थीनंतर दोन्ही बाजुचे कार्यकर्ते शांत झाले.

महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन्ही पक्ष समोरासमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चारही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वातावरण शांत ठेवले. विरोधी पक्षनेते दानवे यांनी शहरात शांतता ठेवण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री स्वतः उमेदवार आहेत. त्यामुळे वातावरण खराब झाले तर याला सर्वतोपरी ते जबाबदार असतील. तर महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांनी, मी त्या ठिकाणी उशिरा दाखल झालो म्हणून काय झाले याची माहिती नाही. खैरे यांना पराभव समोर दिसत असल्याने त्यांची आगपाखड सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT